पिरनवाडी येथील ग्रामस्थांनी केलेल्या विरोधाला डावलून दोन्ही पुतळे तसेच बसवण्याचा समन्वयकारक तोडगा काढण्यात आला.
येथील संगोळी रायण्णा पुतळ्याला अखेर मंत्रीमहोदयांच्या हस्ते अधिकृतरित्या संमती दर्शवून दुजोरा देण्यात आला.
शनिवारी सकाळी दस्तुरखुद्द मंत्रीमहोदयांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुतळा अनावरणाचा सोहळा पार पडला. राज्याचे ग्रामीण पंचायतराज मंत्री के. एस. ईश्वराप्पा आणि पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. त्यामुळे मंत्रीमहोदयांच्या उपस्थितीत या पुतळ्याची अधिकृत स्थापना झाल्याचे प्रत्यंतर आले .
एकंदर प्रकारावरून सर्वच राजकारणी, नेते मंडळींनी शिवप्रेमी मराठी भाषिकांच्या तोंडाला पाने पुसल्याचे निदर्शनास आले.
राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात आलेला हा पुतळा बेकायदेशीर आहे, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. नियमानुसार सदर पुतळ्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे आश्वासनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु विविध कन्नड संघटनांनी रातोरात संगोळी रायण्णा यांचा पुतळा बसविला.
आणि त्यावरून तणावाची परिस्थिती निर्माण झाली. चर्चा आणि बैठकीनंतर अधिकृतरित्या या पुतळ्याला परवानगी देण्यात आली असून मराठी भाषिकांना पोलिसी राजकारणातून दडपले गेल्याची चर्चा सीमाभागात सुरू आहे.