कोविडचे पर्व जेव्हापासून सुरु झाले आहे तेव्हापासून रोज नवनवे दावे आणि नवीन गोष्टी समोर येत आहेत . 5 ऑगष्ट रोजी आरोग्य विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात आता नवीन आदेश जारी केला आहे. याआधी घेण्यात येणाऱ्या स्वॅब टेस्टसाठी केवळ घशातील स्वॅब घेण्यात येत होते परंतु नव्या आदेशानुसार आता 2 स्वॅब नमुने घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये नाकातील एक आणि नाक आणि घशातील एक असे एकूण दोन स्वॅब नमुने घेण्यात येणार आहेत.
स्वॅब चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा पॉझिटिव्ह येण्याची शक्यता आहे. अशी अनेक प्रकरणे सामोरी आल्यामुळे आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे. कोविड संदर्भात घेण्यात येत असलेल्या RTPCR चाचणीत 50% अहवाल निगेटिव्ह येत आहेत परंतु कालांतराने हे रिपोर्ट्स पुन्हा पॉझिटिव्ह येत असल्याची माहिती पुढे आली आहे.
२५ जूनपासूनच्या आकडेवारीनुसार बेळगावमधील लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांचा निगेटिव्ह अहवालाचा दर हा ९% इतका आहे. याशिवाय रामनगरात 4%, हसन 7%, चित्रदुर्गात 8%, धारवाड 11%, मांड्या 16%, बेंगळूर शहर 21% आणि कोलार 22% होते.
आरटीपीसीआर चाचणीनुसार जर निगेटिव्ह आलेले रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह होत असतील तर हे रुग्ण इतरांच्या संपर्कात येऊन संक्रमण वाढण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे हे डोकेदुखी ठरणार आहे.