गेल्या चार महिन्यापेक्षा अधिक काळा पासून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी लागणारा इ पास राज्य सरकारने रद्द केला असून आता कोणत्याही शासकीय पास शिवाय कुणीही कर्नाटकात येऊ शकतो.
शनिवारी केंद्र सरकारने अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात देशातील राज्य सरकारांनी कोणतीही प्रवाशी किंवा मालवाहू वाहतूकला पासची सक्ती करू नका अश्या सूचना दिल्या होत्या त्यासुचनेचं पालन बेळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा कोगनोळी टोल नाक्यावर केलं जाणार आहे.
महाराष्ट्र असो किंवा देशातील कोणत्याही अन्य राज्यातून कर्नाटकात येणाऱ्याना पासची गरज लागणार नाही.निपाणी टोल नाक्यावर 23 रोजी मध्यरात्री 12 पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.निपाणी तहसीलदार यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे.
आंतरराज्य आणि राज्यांतर्गत प्रवास करणाऱ्यांवर आणि वस्तूंची वाहतूक करण्यावर असलेली सगळी बंधने शिथिल करण्याचा आदेश केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना दिला होता.आंतरजिल्हा आणि आंतरराज्य प्रवास करण्यावर स्थानिक पातळीवर अजूनही बंधने असल्याबद्दल केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सगळ्या राज्यांच्या मुख्य सचिवांशी पत्रव्यवहार केला आहे.अनलॉक प्रक्रिया सुरु असताना अशा तऱ्हेची बंधने घातल्यामुळे अनेक बाबीवर परिणाम होत आहे.वस्तूंच्या पुरवठा साखळीवर देखील परिणाम होऊन त्याचा परिणाम आर्थिक बाबीवर आणि रोजगारावर देखील होत आहे.
व्यक्तींना आंतरराज्य प्रवास करण्यावर आणि वस्तूंची वाहतूक करण्यासाठी कोणतीही परवानगी लागणार नाही हे अनलॉक प्रक्रियेत स्पष्ट करण्यात आले आहे असेही मुख्य सचिवांना पाठवलेल्या पात्रात नमूद करण्यात आले होते.अनलॉक प्रक्रिया 1 जून पासून सुरु झाली असून त्याप्रमाणे अमलबजावणी केली पाहिजे असेही कळवण्यात आले आहे.
गेल्या मार्च महिन्या पासून कोगनोळी चेक पोस्टवर तपासणी सुरू होती आता सोमवारी 24 पासून या आणि राज्यातील इतर नाक्यावर देखील तपासणी होणार नाही.