पंत बाळेकुंद्री येथील विष्णू कानेकर यांच्या घरात शयनगृहात अडीज फुटी घोरपड ( moniter lizerd ) घुसल्याने एकच तारांबळ उडाली. सामाजिक कार्यकर्ते निवृत्त जवान प्रमोद पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांना पाचारण केले. चिठ्ठी यांनी अतिशय आक्रमक असलेल्या या घोरपडीला शिताफीने पकडले व सर्वानी सुटकेचा निश्वास सोडला.
सुमारे अडीज फूट लांबीच्या या घोरपडीला वन विभागाच्या सहकार्याने सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले. बिळात वास्तव्य करणारा हा प्राणी पाल व सरड्याशी बराच साधर्म्य साधतो. घोरपड पाच फुटांपर्यंत वाढू शकते भुसभुशीत मातीत किंव्हा मुंग्यांच्या वारुळात 20 ते 25 अंडी घालते.
उंदीर, बेडूक, पक्षी, अंडी, कीटक, मासे, खेकडे याचे प्रमुख खाद्य आहे.
घोरपड आक्रमक झाल्यास शरीर फुगविते तसेच तोंडाने गुरगुरण्याचा आवाज करत आपल्या शक्तिशाली शेपटीने तडाखे मारत हल्ला चढविते.
हा प्राणी जमिनीसह, झाडावर व पाण्यातही वेगाने पळतो. याची शेपटी जाडजूड व शक्तिशाली असल्याने पोहताना वलह्यासारखा उपयोग करते तर शत्रूला शेपटीने जोरदार तडाखा मारते. याची पकड फार मजबूत असते. उंच ठिकाणी व किल्ले चढण्यासाठी याचा उपयोग पूर्वीच्या काळी व्हायचा असा समज आहे.
याला खाण्यासाठी तसेच याच्या चरबीपासून औषध निर्मिती करण्याच्या गैरसमजजुतीने मोठया प्रमाणात या घोरपडीची हत्या केली जाते. याला विषारीही समजले जाते, वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत घोरपडीला पाळणे व शिकार करणे गुन्हा आहे अशी माहिती सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांनी दिली.