गेले ३ दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहर परिसरात पाणीच पाणी साचले आहे. शहरातील काँग्रेस रोड वरील मिलिटरी महादेवच्या प्रवेशद्वाराजवळ पाणी साचून स्विमिंग पुलचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या पाण्याचा निचरा होण्यासाठी दुभाजकही फोडण्यात आले. परंतु तरीही अतिप्रमाणात पाणी वाहून आल्यामुळे परिस्थिती जैसे थेच राहिली.
या परिसराची पाहणी केली असता मिलिटरी महादेव जवळील प्रवेशद्वाराजवळ रस्ता उतरताच स्वरूपात आहे. याचप्रमाणे गोगटे सर्कल पासूनही या स्थळापर्यंत उतारतीचाच रस्ता आहे. शिवाय या परिसरात गटारींचीही योग्य व्यवस्था नाही त्यामुळे येथे कायम पाणी साचते. आणि पाण्याचा लवकर निचराही होत नाही.
या पाण्याचा निचरा होण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत होण्यासाठी स्मार्ट सिटीच्या अभियंत्यांनी प्रयत्न केले. या रस्त्यावर साध्या पद्धतीने काँक्रीटीकरण करण्यात आले आणि या पाण्याला रेल्वे ट्रॅक जवळील नाल्याला जोडल्यास या पाण्याचा निचरा होईल. आणि पाणी साचणार नाही. नवीन रस्ता करताना पाण्याचा निचरा योग्यपद्धतीने होण्यासाठी बांधकाम होणे गरजेचे आहे.
सतत साचणाऱ्या या पाण्यावर येथील रहिवाशांनी अनेकवेळा तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. आणि वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांनाही सांगितले आहे. नेहमीच होणाऱ्या या समस्येवर आता संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष पुरवून येत्या काळात हि समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.