शुक्रवारी दिवसभर पुतळ्यावरून सुरु झालेल्या वादामुळे पिरनवाडीमध्ये तणावपूर्ण वातावरण बनले होते. मराठा समाज आणि कन्नड समाजातील दोन्ही गटांनी दिवसभर घोषणाबाजी करून निषेध नोंदविला. संपूर्ण शहरच तणावाच्या वातावरणात होते. या दरम्यान राज्य कायदा आणि सुव्यवस्था अधिकारी अमरकुमार पांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही समाजातील नेत्यांची शांतता सभा घेतली.
यादरम्यान त्यांनी समाजात कायदा आणि सुव्यवस्थेला कोणत्याही प्रकारे धक्का पोहोचेल असे वागू नये, अशी कोणतीही पाऊले उचली नयेत. सामंजस्य, सलोखा आणि शांततेने याप्रश्नी तोडगा काढला जाईल. तसेच समाजात अहिंसा होईल अशी कोणतीही घटना घडण्यापासून रोखावे, असे आवाहन केले.
या बैठकीला जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ, आयजीपी राघवेंद्र सुहास, पोलिस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, डीसीपी सीमा लाटकर यांच्यासह अनेक पोलिस अधिकारी, कन्नड आणि मराठी नेते उपस्थित होते.
यापुढील काळात या पुतळा वादावरून कोणत्या गोष्टी घडतील, अनुचित प्रकार होण्यापासून पोलीस दलाला आणि प्रशासनाला यश येईल का? हा वाद पुढे कोणते वळण घेईल आणि या बैठकीनंतर पोलीस आणि जिल्हा प्रशासन कोणत्या निर्णयाप्रती येऊन पोहोचेल, याकडे आता साऱ्यांच्या नजरा खिळून आहेत.
दरम्यान पिरन वाडीतील लक्ष्मी मंगल कार्यालयात ए डी जी पी बैठक घेत आहेत.दोन्ही समाज प्रमुख या बैठकीत सहभागी झाले आहेत.
पिरनवाडी पुतळा वाद शांततेने सोडवू : गृहमंत्री
२७ ऑगस्ट रोजी घाईगडबडीत बसविण्यात आलेल्या क्रांतिवीर संगोळी रायण्णांच्या पुतळ्यासंदर्भात झालेल्या वादामुळे आज पिरनवाडीत तणाव निर्माण झाला. यादरम्यान ग्रामस्थांनी, मराठा समाजातील नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान बंगळूर येथे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी यासंदर्भात चर्चा केली. हा वाद शांततेने मिटवून याप्रश्नी तोडगा काढू असे आश्वासन गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज असोत किंवा क्रांतिवीर संगोळी रायण्णा दोन्हीही थोर व्यक्तिमत्वे आहेत. त्यांच्या शौर्यगाथा महान आहेत. प्रत्येकाने त्यांचा आदर केला पाहिजे. सन्मान दिला पाहिजे. याप्रश्नी दोन्ही समाजातील नेत्यांची बैठक घेऊन चर्चा केली जाईल. तसेच जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी याना यासंदर्भात बैठक बोलावून चर्चा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचप्रमाणे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांशीही यासंदर्भात चर्चा करण्यात आली असून याप्रश्नी शांततेने, सलोख्याने तोडगा काढण्याचे आश्वासन गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले आहे.
यासंदर्भात उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनीही शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी काही लोकांच्या संकुचित वृत्तीमुळे हा वाद झाल्याचे म्हटले आहे. हा विषय शांततेने सोडवावा असे आवाहन त्यांनी केले आहे.