मुसळधार पावसाने बेळगाव शहर तालुका आणि खानापूर तालुक्यात आपले रौद्ररूप दाखवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 24 तासांपासून झोडपून काढणाऱ्या पावसामुळे नदी -नाले तुडुंब भरून वाहत असून नागरी वसाहतींमध्ये पूर परिस्थिती निर्माण निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागल्याने घबराट पसरली आहे.
गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव शहर परिसरातील सखल भागात पाणीच पाणी झाली आहे. मुसळधार पावसामुळे एसपीएम रोड येथील घरांमध्ये नजीकच्या नाल्यातील पाणी शिरण्याचा प्रकार घडला आहे. संबंधित भागात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून हाच प्रकार टिळकवाडीतील महात्मा गांधी कॉलनी, विवेकानंद कॉलनी व मराठा कॉलनी या ठिकाणी पहावयास मिळत आहे. सदर वसाहतींमध्ये घराघरात पावसाचे पाणी शिरल्यामुळे नागरिकांची पाचावर धारण बसली आहे.
दरम्यान, पावसामुळे आज सकाळी एक झाड उन्मळून पडल्याची घटना रेल्वे फ्लाय ओव्हर ब्रिजवर घडली. त्यामुळे या मार्गावरील एका बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. याच पद्धतीने एक नारळाचे झाड उन्मळून पडल्यामुळे येळ्ळूर गावाकडे जाणार्या रस्त्यावरील वाहतुकीस कांही काळ अडथळा निर्माण झाला होता. सध्या शहरातील महात्मा गांधी कॉलनी, विवेकानंद कॉलनी, मराठा कॉलनी, शास्त्रीनगर, शिवाजीनगर आदी भागात मुसळधार पावसामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या पद्धतीने आणखी 24 तास पाऊस कोसळत राहिल्यास प्रशासनाला कोरोना प्रादुर्भावाला विसरण्याची वेळ येणार आहे.
दरम्यान, याला कारणीभूत शहरातील स्मार्ट सिटीची कामे असल्याचा आरोप केला जात आहे. स्मार्ट सिटीची कामे सुरू असलेल्या ठिकाणी तर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे संबंधित भागातून ये-जा करताना वाहन चालकांना विशेष करून दुचाकी वाहनचालकांना जीव मुठीत धरून कसरत करावी लागत आहे. अर्धवट अवस्थेतील बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या ढिसाळ नियोजन आणि काम करण्याच्या पद्धतीमुळे सध्या शहरवासियांना रस्त्यावरील खाच-खळगे आणि पावसाच्या गढूळ पाण्यातून जीवावर उदार होत वाट काढण्याची वेळ आली आहे.
गेल्या 24 तासातील पावसाचा तडाखा इतका मोठा होता, की बेळगाव कृषी उत्पन्न बाजार पेठ अर्थात एपीएमसी आवाराची एका बाजूची भिंत कोसळण्याची घटना आज सकाळी घडली. सदर भिंत कोसळल्यामुळे या रस्त्यावरील रहदारीस कांही काळ अडथळा निर्माण झाला होता. स्मार्ट सिटीच्या कामामुळे विकास होण्याऐवजी पाण्याचा निचरा होणारे शहरातील बऱ्याच ठिकाणचे मार्ग बंद झाले आहेत.
मुसळधार पावसामुळे पाणी तुंबत असल्याने शहरात बहुतांश ठिकाणी याचे प्रत्यंतर येत आहे. एकंदर शहरातील रस्ते व अन्य भागांची पार दुर्दशा झाल्याचे या मुसळधार पावसाने दाखवून दिल्यामुळे नागरिक बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या नांवाने खडे फोडताना दिसत आहेत.
संततधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदी दुथडी भरून वाहत आहे. मलाप्रभा नदी काठोकाठ भरून वाहत असल्याने नदीकाठच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नदीचे पाणी इतके वाढले आहे की आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हब्बनहट्टी (ता. खानापूर) येथील श्री मारुती मंदिर पूर्णपणे मलप्रभा नदीपात्रात बुडाले होते. या मंदिराच्या कळसावरील ध्वज काय तो पात्राबाहेर दिसून येत होता. एकंदर दुथडी भरुन वाहणारी मलप्रभा पाहता खानापूर तालुक्याती नदी परिसरात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.