कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवावर निर्बंध घालण्यात आले होते. परंतु परंपरागत चालत आलेल्या या उत्सवावर निर्बंध न घालता साधेपणात उत्सव साजरा करण्याची परवानगी गणेश महामंडळाकडून मागण्यात आली होती. प्रशासनाने सशर्त परवानगी दिली.
परंतु रस्त्यावर मंडप उभा करण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आणि पर्यायी व्यवस्था म्हणून मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना करण्याचे आदेश दिले. परंतु यासंदर्भात मंदिरांची सोय नसलेल्या सार्वजनिक मंडळांनी पुन्हा धाव घेतली.
प्रशासनाने मंदिरांची सुविधा नसलेल्या मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय मूर्तीची उंचीदेखील 4 फूट असणे अनिवार्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. एकावेळेस 20 जणांना मंडपात एकत्र येण्याचीही परवानगी प्रशासनाने दिली आहे.
गणेशोत्सव साध्या पद्धतीने, भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात यावा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 4 फुटी तर घरगुती गणेशोत्सवासाठी 2 फुटी श्रीमूर्तींची प्रतिष्ठापना करणे, मूर्ती आगमन किंवा विसर्जनावेळी मिरवणूक काढणे यावर संपूर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत.
उत्सवाचे आचरण साध्या पद्धतिने करावयाचे असून या दरम्यान महाप्रसाद, भजन आणि इतर कोणतेही धार्मिक कार्यक्रम करण्यास मनाई आहे.
उत्सव काळात समाजात शांती, सौहार्द आणि सलोख्याचे वातावरण राखावे, कोणत्याही कारणास्तव समाजातील कायदा आणि सुव्यवस्था भंग होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. प्रशासनाने ठरविण्यात आलेल्या मार्गसूचीचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आपत्ती निवारण कायदा २००५ आणि भादंवि कलम १८८ च्या अन्व्ये कठोर कारवाई करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.