‘हेल्प फाॅर नीडी’ च्या सामाजिक कार्याची व्याप्ती आता बेळगांव शहर व तालुक्याच्या सीमेपार गेली आहे. हेल्प फाॅर नीडी बेळगांव संघटनेचे प्रमुख व धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर यांनी आता बेळगांवप्रमाणे जनहितार्थ गोकाक शहरासाठी दखील मोफत हर्सव्हेन अर्थात शववाहिका उपलब्ध करून दिली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कमी पडू लागली आहे, त्यामुळे प्रशासनाकडून सार्वजनिक मदत घेतली जात आहे. याअनुषंगाने गोकाकमधील रुग्णसेवेसाठी बेळगावच्या हेल्प फाॅर नीडीची मदत घेण्यात आली आहे.
गोकाकच्या तलाठ्यांसह रोटरी क्लब ऑफ गोकाकचे सोमशेखर मगदूम यांनी वैयक्तिकरित्या सुरेंद्र अनगोळकर यांच्याशी संपर्क साधून शववाहिका उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.
त्यानुसार सुरेंद्र अनगोळकर यांनी आज मंगळवारी हेल्प फाॅर नीडीची हर्सव्हेन अर्थात शववाहिका मोफत उपलब्ध करून देताना व्हॅनच्या चाव्या चालकाकडे सुपूर्द केल्या. याप्रसंगी योगेश कलघटगी, बसवराज आदी उपस्थित होते.