राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवास परवानगी नसली तरी बेळगाव जिल्ह्यातील गणेशोत्सव सोहळ्यास देण्यात आलेल्या सशर्त परवानगीचे बेळगावच्या गणेश महामंडळाने स्वागत केले आहे.
प्रशासनाने जरी केलेल्या आदेशात सार्वजनिक मंडळांच्या वतीने बसविण्यात येणाऱ्या मूर्तींची प्रतिष्ठापना हि जवळपासच्या मंदिरात करावी असे सूचित केले आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्यावतीने पुन्हा एकदा फेरविचार करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची आज किंवा उद्या भेट घेण्यात येणार आहे.
सार्वजनिक मंडळांनी मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्याला आदेश देण्यात आले आहेत. बेळगाव शहरात एकूण ३७८ सार्वजनिक मंडळे आहेत. परिणामी संपूर्ण जिल्ह्यात इतकी मंदिरे नसून सर्वच सार्वजनिक मंडळांना मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना करणे शक्य नाही. यामुळे या मंडळांनी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना कोठे करावी हा प्रश्न उपस्थित झाला आहे. याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी महामंडळाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील यांनी दिली आहे.
संपूर्ण बेळगाव जिल्ह्याचा विचार करून जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सवाबाबत हि मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. परंतु बेळगावची समस्या हि एका वेगळ्या प्रकारची आहे. शिवाय प्रशासनाने घालून दिलेल्या कोणत्याही नियम, अटींची पायमल्ली होणार नाही, याची खबरदारी प्रत्येक मंडळाच्यावतीने घेतली जाईल, त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांनी फेरविचार करावा आणि या समस्या लक्षात घेऊन प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी आशा गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.