मार्चपासून सुरु असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय आणि खबरदारी म्हणून कर्नाटक सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध घातले आहेत. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी याबाबत अधिकृत घोषणाही केली होती.
परंतु नुकतेच बेळगाव मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साधेपणात गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात परवानगी मिळावी, अन्यथा सरकारचा आदेश डावलून गणेशोत्सव साजरा करण्याचा इशारा दिला होता. यानंतर पुन्हा काही वेबसाईटवर गणेशोत्सवावर निर्बंध घालण्यात आल्याच्या बातम्या झळकल्या. यासाठी आज पुन्हा शहर पोलीस आयुक्तांना मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाने निवेदन सादर केले आहे.
वैभवशाली परंपरा लाभलेल्या बेळगावच्या गणेशोत्सवाला सरकारी नियमांच्या बंधनात अडकवू नये. त्याचप्रमाणे साधेपणाने उत्सव साजरा करण्यास शहरातील गणेश मंडळे सज्ज असून त्यासाठी पोलिस प्रशासनाने आवश्यक सहकार्य करावे, अशी मागणी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.
अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी हा उत्सव साधेपणात तसेच सर्व उपाययोजना आणि खबरदारीसह साजरा करण्याचे ठरविले आहे. परंतु तरीही अशाप्रकारे निर्बंध घालणे योग्य नाही. ज्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने या उत्सवासाठी मार्गदर्शक सूची प्रसारित केली आहे त्याप्रमाणे कर्नाटक सरकारनेही मार्गदर्शक तत्वे ठरवून हा उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांना देण्यात आले.
यावेळी महामंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, विकास कलघटगी, गणेश दड्डीकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन सादर केले.