सांबरा (ता. बेळगांव) येथे दरवर्षी सार्वजनिक श्री गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, परंतु कोरोनाचे संकट लक्षात घेऊन यंदाचा सार्वजनिक श्री गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने 7 दिवसाचा साजरा करण्याचा अत्यंत स्तुत्य व आदर्शवत निर्णय घेण्यात आला आहे.
सांबरा गांवातील श्री लक्ष्मी देवस्थानांमध्ये आज रविवारी झालेल्या देवस्थान पंच कमिटी आणि सांबरा ग्रामस्थ व युवक मंडळाच्या संयुक्त बैठकीत उपरोक्त निर्णय एकमताने घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष राजू देसाई हे होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक झाल्यानंतर जि. पं. सदस्य नागेश देसाई यांनी कोरोनाचे संकट लक्षात घेऊन यंदाचा सार्वजनिक श्री गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला.
सांबरा गांवात एकूण 17 सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळे आहेत. गणेशोत्सव काळात सांबरा गांवातील सार्वजनिक श्री मूर्ती व देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. तथापि यंदा कोरोना संकट काळात तशी गर्दी झाल्यास संसर्गाचा मोठा धोका आहे.
तेंव्हा हा धोका टाळण्यासाठी गर्दीला आळा घालणे आवश्यक असल्यामुळे यावर्षी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे नागेश देसाई यांनी सांगितले. यावर सांगोपांग चर्चा होऊन जनहितार्थ यंदाचा गणेशोत्सव 11 ऐवजी 7 दिवसांचा करायचा. तसेच विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आदी खर्चिक बाबींना पूर्णपणे फाटा देऊन अत्यंत साध्या पद्धतीने कोरोना संदर्भातील नियम पालनाद्वारे गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला उपस्थित सर्वांनी एकमताने पाठिंबा दिली.
सार्वजनिक गणेशोत्सवा प्रमाणेच दरवर्षी श्रावणात आयोजित केले जाणारे महाप्रसाद वाटप कार्यक्रम यंदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरवर्षी श्रावणातील शेवटच्या गुरुवारी गावातील श्री बसवण मंदिरात महाप्रसादाचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे श्रावणमास समाप्तीनिमित्त नजीकच्या डोंगरावरील श्री शिव व गणेश मंदिराच्या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या दोन्ही महाप्रसाद कार्यक्रमांना सांबऱ्यासह आसपासच्या परिसरातील शेकडो भाविकांची गर्दी होत असते. कोरोनामुळे यावेळी तशी गर्दी होणे धोकादायक असल्याने यंदा हे दोन्ही महाप्रसाद रद्द करण्याचे आणि रीतीरिवाजाप्रमाणे त्यादिवशी पंच कमिटीतर्फे देवाला फक्त नैवैद्य दाखवण्याचे आजच्या बैठकीत ठरले.
बैठकीस भरमगौडा पाटील, महेश जत्राटी, शंकर जत्राटी, मारुती सोंजी, निळकंठराव देसाई, ज्योतिबा तिप्पानाचे, शेखर करडीगुद्दी, मनोहर जुई, शिवाजी घटरट्टी, अरुण देसाई, मल्लाप्पा कांबळे, रामचंद्र देसाई आदींसह पंच कमिटीचे सदस्य, आजी-माजी लोकप्रतिनिधी, युवक मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, सांबरा देवस्थान पंचकमिटी व ग्रामस्थांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या बाबतीत घेतलेल्या उपरोक्त निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असून सांबरा गावचा आदर्श इतर गावांनीही घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.