सुळगा (हिंडलगा) येथील महिलेचा खून करून आत्महत्या केल्याचा बनाव केल्या प्रकरणी सासू
-सासऱ्यासह चौघा जणांना काकती पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी अटक केलेल्या चौघांनी खुनाची कबुली दिली असल्याची माहिती पोलीसानी दिली.
गीतांजली जोतिबा शहापूरकर (वय 42) रा. ब्रह्मलिंग गल्ली, सुळगा असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. 6 जूनच्या रात्री 10 ते 7 जूनच्या सकाळी 7 या वेळेत गीतांजलीने न्हाणीघरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी अटक केलेल्या चौघांनी भासवले होते.या बाबत काकती पोलीस स्थानकात आत्महत्या प्रकरण दाखल करण्यात आले होते.
गीतांजलीचे वडील वासू यादव मायाण्णा (वय 72) रा. कडोली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार दिवसांपूर्वी चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सासरा निंगाप्पा गुंडू शहापूरकर (वय 70), सासू लक्ष्मी निंगाप्पा शहापूरकर (वय 61), दीर उमेश निंगाप्पा शहापूरकर (वय 35), भावजय लता उमेश शहापूरकर (वय 30) सर्व राहणार सुळगा (हिंडलगा) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भारतीय महिला फेडरेशनच्या प्रमोदा हजारे यांच्या पुढाकारातून गीतांजलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे दाद मागितली होती. काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर व त्यांच्या सहकाऱयांनी या प्रकरणातील चौघा जणांना अटक करून त्यांची कसून चौकशी केली असता सत्य बाहेर आले.
मालमत्तेसाठी व गीतांजलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करून उशीने नाक-तोंड दाबून तिचा खून करण्यात आला आहे. खुनानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी न्हाणीघरात गीतांजलीचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत लटकविण्यात आला होता. अटक करण्यात आलेल्या चौघा जणांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर, पोलीस उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. या चौकडीची हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सुरुवातीला 174सी (सीआरपीसी) कलमान्वये संशयास्पद मृत्यू प्रकरण असे या प्रकरणाची नोंद करण्यात आली होती. आता भादंवि 323, 302, 506, सहकलम 34 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करून तपास हाती घेण्यात आला आहे.