पुर आलेल्या पांढरी नदीचा पूल पार करताना पाण्यासोबत वाहून गेलेला एक शेतकरी झाडावर अडकून पडला होता. तीन तास शेतकऱ्याने जिद्द न हरता झाडावरच तळ ठोकून मदतीसाठी आरडाओरडा करून प्रसंगावधान दाखविले. अखेर अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन तासाच्या अथक प्रयत्नांनी त्याची सहीसलामत सुटका केली.
पुराच्या पहिल्याच दिवशी हा आश्चर्य कारक प्रकार खानापूर तालुक्यातील कापोलीच्या विलास दत्तात्रय देसाई (वय 60 वर्षे) या शेतकऱ्याच्या बाबतीत घडला आहे.
देसाई यांची शिंदोळी बीके गावच्या हद्दीत शेतजमीन आहे. त्याठिकाणी नेहमीप्रमाणे ते कामासाठी गेले होते. मात्र दुपारी पांढरी नदीला पूर आल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरी परत जाण्याचा रस्ता बंद झाल्याने ते त्या ठिकाणी अडकून पडले. मात्र आणखी पाणी वाढेल या भीतीने त्यांनी पूल पार करण्याचा धाडसी निर्णय घेतला. मात्र पुलावरून पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते वाहून गेले. नदीच्या प्रवाहाबरोबर वाहून जाताना एका झाडाचा त्यांनी आधार घेतला.
झाडावर सुरक्षित ठिकाणी चढून बसले. बराच वेळ आरडाओरडा केल्यानंतर पाणी बघण्यासाठी आलेल्या काही युवकांची त्यांच्यावर नजर गेली. याबाबत गावात माहिती देण्यात आली. लागलीच ग्रामस्थांनी नंदगड पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली.
खानापूरच्या तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनीही घटनास्थळी धाव घेतली. अखेर दोन तासाच्या अथक प्रयत्नांनी अग्निशमन दलाच्या जवानांनी शेतकऱ्याची पुरातून सहीसलामत सुटका केली. तालुक्यात सध्या मुसळधार पावसाचा जोर कायम असून नदी नाल्यानी धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जीव धोक्यात घालून नदी नाल्यातून प्रवास करण्याचे धाडस करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी दोन एनडीआरएफच्या टीम, बोट, नावाडी आदि यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार रेशमा तालिकोटी यांनी दिली.