करमणुकीचे साधन म्हणून टीव्हीचा वापर केला जातो. परंतु करमणुकीचा भाग असलेल्या टीव्ही संचाने प्रत्येकाच्या जीवनात एक अविभाज्य घटक म्हणून स्थान मिळविले आहे. मालिका, रिऍलिटी शो, विनोदी कार्यक्रम, धार्मिक-अध्यात्मिक कार्यक्रम, गाणी, लहान मुलांचे कार्यक्रम, बातम्या आणि असे अनेक प्रकार आता टीव्हीवर पाहायला मिळतात. साधारण १० वर्षांपूर्वी समाजातील गोष्टींचा आरसा म्हणून टीव्ही संचात अनेक गोष्टी पहायला मिळायच्या. परंतु जसजसा समाज आणि समाजव्यवस्था बदलत गेली तसतसे टीव्हीतील कार्यक्रमांचे स्वरूपही पालटत गेले.
काही वर्षांपूर्वी कुटुंब एकत्रित बसेल आणि टीव्हीवरील कार्यक्रमांचा मनमुराद आनंद लुटू शकेल असे अनेक कार्यक्रम प्रसारित व्हायचे. परंतु आजकालचे कार्यक्रम पाहता समाज आणि कुटुंब व्यवस्था सुधारण्याऐवजी बिघडण्याची चिन्ह दिसून येत आहेत.
मराठी मालिकांनी तर असे विषय हाताळले आहेत की त्यामुळे एकत्रित बसून एखादी मालिका पाहिली तर घरात दुभंग पडल्याशिवाय राहणार नाही. आणि महिलांची मानसिकता चुकीच्या दिशेने गेल्याशिवाय राहणार नाही!
त्यातही “महिला” हा विषय अत्यंत दुबळेपणाने मांडण्यात येतो. राष्ट्रीय पातळीवर महिला सबलीकरणासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु मराठी, हिंदीसह प्रत्येक भाषेत महिलांच्या सबलीकरणाऐवजी त्या किती आणि कशा दुर्बल आहेत याचेच प्रदर्शन या मालिकांमधून दाखविण्यात येत आहे. प्रत्येक मालिकेत एखादी तरी स्त्री ही अशी असते कि जी दीन-दुबळी आहेच. कुणी आर्थिकरित्या, कुणी मानसिकरीत्या, कुणी शैक्षिणकरीत्या तर चक्क कुणी रंगाच्या बाबतीत! या अशा थोतांड व्यक्तिरेखा प्रत्येक वाहिनीवरील प्रत्येक कौटुंबिक कार्यक्रमात दाखविल्या जातात.
शूरवीर आणि समाजहितासाठी झगडून अनेक क्रांतिकारी, इतिहास घडविणाऱ्या महिलांच्या आपल्या संस्कृतीत टीव्ही माध्यमातून नक्की महिलांचे कोणते रूप दाखविण्यात येत आहे, याबाबत उदासीनता तर वाटत आहेच शिवाय मराठी रंगभूमीच्या छोट्या पडद्यावर प्रश्नचिन्ह उभारण्याची वेळ आली आहे.
अशी कोणतीही मालिका नाही जिथे स्त्री दुसऱ्या स्त्रीचा सन्मान करताना दिसते; याउलट प्रत्येक मालिकेत प्रत्येक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीचा अपमान, दु:सास, द्वेष करताना दिसते. सासू-सून, नणंद-भावजय, अशा अनेक नात्यांमध्ये केवळ आणि केवळ नकारात्मक गोष्टी दाखविल्या जातात. इतकेच काय तर जवळपास प्रत्येक मालिकेत एक नायक, दोन नायिका, त्यांचे परस्पर संबंध, महिलांच्या आपापसातील कुरघोडी या पलीकडे कोणतीही मालिका कथानक रंगवताना दिसत नाही. त्यातही दोन-अडीच वर्षाहून अधिक काळ तोच तो रटाळपणा पाहून प्रेक्षकही आता वैतागले आहेत. यामुळे कथाबाह्य कार्यक्रम टीव्हीवर आले तर प्रेक्षकांसाठी ही पर्वणी ठरते.
मराठी रंगभूमीने नक्कीच कात टाकली आहे. मराठी रंगभूमीला आता सोन्याचे दिवस आले आहेत असे मानले जाते. परंतु मराठी छोट्या पडद्यावर रंगभूमीचे सोन्याचे दिवस जरी आले तरी या माध्यमातून समाजाची दिशा भरकटवण्याचे कार्य केले जात आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. वाढत्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक जण धावपळीच्या जीवनशैलीत रंगून गेला आहे. अशातच एकत्र कुटुंब पद्धतीही जवळपास कोलमडून गेली आहे. निदान टीव्ही-मालिकांच्या निमित्ताने एखाद-दुसरा तास संपूर्ण कुटुंब रंजक, मनोरंजक आणि मालिकांमधून सकारात्मक संदेश मिळविण्यासाठी एकत्रित येऊन बसेल असे कार्यक्रम दाखविणे गरजेचे आहे. समाजाने या मालिकांद्वारे चांगला आदर्श घेऊन समाज घडवावा, नव्या आदर्शांसह संस्कृती जपावी इतकीच माफक अपेक्षा आहे.
-वसुधा सांबरेकर,