संभाजी गल्ली, एसपीएम रोड सेकंड क्रॉस कॉर्नर येथील गटार मोठ्या प्रमाणात तुंबून पावसाचे पाणी आसपासच्या घरात शिरल्याची घटना नुकतीच घडली. दरवर्षी या ठिकाणी हा प्रकार घडत असल्यामुळे या ठिकाणच्या गटारीचे बांधकाम नव्याने करण्यात यावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे काल बुधवारी संभाजी गल्ली, एसपीएम रोड सेकंड क्रॉस कॉर्नर येथील गटार मोठ्या प्रमाणात तुंबून पावसाचे पाणी आसपासच्या घरात शिरले.
परिणामी येथील नागरिकांना बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागले.
एसपीएम रोड मुख्य रस्त्यापासून भातकांडे हायस्कूलच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील सीडीवर्क अत्यंत जुने झाल्यामुळे हा प्रकार घडत आहे. कपिलेश्वर तलावाशेजारील जवळपास 50 वर्षे जुन्या गटारीतील सांडपाणी संभाजी गल्ली, एसपीएम रोड सेकंड क्रॉस कॉर्नर येथील गटारीला येऊन मिळते.
जुने सीडी वर्क आणि मोठ्या प्रमाणात सांडपाणी व कचऱ्याच्या प्रवाहामुळे संबंधित ठिकाणी पावसाळ्यात गटारातील पाणी ओव्हरफ्लो होऊन घराघरात शिरत असते. यंदाही हा प्रकार घडत आहे.
तेंव्हा संबंधित खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संभाजी गल्ली, एसपीएम रोड सेकंड क्रॉस कॉर्नर येथील गटारीची पुनर्बांधणी करावी. मात्र तूर्तास संबंधित गटारीतील केरकचरा व गाळ तात्काळ काढून पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होण्याची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.