हलगा (ता. बेळगांव) येथील शेतवाडीमध्ये मंगळवारी 4 ऑगस्ट रोजी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे हलगा गावात एकच खळबळ उडाली होती.
हलगा गांवातील शेतकरी नेहमीप्रमाणे सकाळी शेतात कामाला गेले असता हा प्रकार उघडकीस आला. चौकशीअंती मयत इसम गावातील नसल्याचे स्पष्ट झाले.
शेतवाडीत मृतदेह आढळून आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. याबाबतची माहिती पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर बागेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन. एन. अंबिगर व पोलीस उपनिरीक्षक शशिकुमार कुराळे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.
तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाकडे धाडला. सडपातळ बांध्याचा मयत इसम अंदाजे 30 ते 35 वर्षे वयोगटातील असून त्याच्या अंगावर चॉकलेटी शर्ट व काळी जीनपॅन्ट असा पोषाख आहे.
ओळख पटण्यासाठी मयत इसमाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे.