बाळेकुंद्री खुर्द ग्रामपंचायतीचे अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आल्यामुळे प्रादेशिक आयुक्त अमलान बिश्वास यांनी त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस सरकारकडे केली आहे.
बाळेकुंद्री खुर्द ग्रामपंचायत अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी 26 लाख 78 हजार 473 रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी प्रादेशिक आयुक्त बिश्वास यांच्यासमोर सुनावणी झाली. या सुनावणीप्रसंगी जाधव यांनी ग्रामपंचायतीची 86,781 रुपयांची घरपट्टी पंचायतीच्या खात्यावर जमा न करता स्वतःच्या खात्यावर जमा केली या पद्धतीने एकूण 26 लाख 78 हजार 473 रुपयांचा सरकारी निधीचा गैरवापर केला असल्याचा आरोप जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केला.
या आरोपात तथ्य आढळून आल्यामुळे प्रादेशिक आयुक्त अमलान बिश्वास यांनी प्रशांत जाधव यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच त्यांचे सदस्यत्व रद्द करावी अशी शिफारस केली आहे. तथापि ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपला असल्यामुळे सदस्यत्व रद्द करता येणार नाही.
ग्रामपंचायतीची विकास कामे राबवताना कोणतीही निविदा मागविण्यात आलेली नाही, असेही चौकशीत स्पष्ट झाले आहे. प्रशांत जाधव हे आयुक्तांसमोरील एकाही सुनावणीला हजर राहिले नाहीत. त्यांनी प्रत्येक वेळी वकिलांकरवी आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला.
त्याचप्रमाणे न्यायालयाचा वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न केला आहे, असेही आयुक्तांनी आपल्या निकालपत्रात म्हंटले आहे. सरकारने जाधव यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी शिफारस त्यांनी सरकारला केली आहे. या प्रकरणात जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी जून महिन्यातही प्रशांत जाधव यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.