गेल्या वर्षी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या जलसंपदा विभागा मध्ये समन्वय नसल्यामुळे महापुराचे संकट ओढवल्याचे सिद्ध झाले आहे. त्याच प्रमाणे यंदा या दोन राज्यांमधील धरणातील पाणीसाठा आणि विसर्ग बाबत योग्य समन्वय राखल्यामुळे महापुराचा धोका टाळण्यात सलग दोनवेळा यश येत असल्याचे दिसत आहे. कर्नाटकाचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी आणि महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी हा समन्वय साधून दोनवेळा पूर टाळू शकले असल्याने या दोघांच्या कर्तृत्वाचे कौतुक हे करावेच लागेल.
असा समन्वय कायम राहिला तर कोल्हापूर-सांगली ला येणारा महापूराचा संभाव्य धोका कमी होणार आहे. अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी 517 मीटरच्या वर गेली त्याच्या बॅक वॉटर मुळे कोल्हापूर सांगली जिल्ह्याला महापुराचा वेढा पडायला सुरुवात होते. याचा प्रत्यय 2005 आणि 2019 सालच्या महापूरावेळी आलेला आहे.
यामध्ये कृष्णा वारणा पंचगंगा नदीकाठच्या गावांवर जलप्रलयाचे संकट ओढवते, असा निष्कर्ष तज्ज्ञांच्या एका समितीने ही 2005 साली काढलेला आहे.
अलमट्टी धरणात 519.6 मीटरपर्यंत पाण्याचा साठा केल्यामुळे सांगली कोल्हापूरपर्यंत भागात नैसर्गिक पुराच्या पाणी पातळीत 4.33 मीटर म्हणजेच 14.13 फुटाने वाढ होऊन या भागातील नागरी वस्त्या आणि शेती पाण्याखाली जाते हेही स्पष्ट झाले आहे .
कोल्हापूर सांगली तील महापूराला अलमट्टी धरणातील पाणीसाठा आणि पाणी पातळी कारणीभूत ठरत असल्याचे गेल्या काही वर्षात कित्येक पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. अनेक तज्ञांच्या हवाल्याने दर्शवून दिले आहे. अखेर यावर्षी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य शासनाने हे मान्य करून तिच्या परिचालनासाठीही दोन राज्य संयुक्तपणे कार्यवाही करीत आहेत. दोन्ही राज्यांचे मंत्री आणि अधिकारी यासाठी कार्यरत झाले आहेत. त्या समन्वयामुळे त्यांना दोन वेळा महापुराचे संकट टाळता आले आहे. दोन्ही राज्यांच्या जलसंपदा विभागांनी आता अलमट्टीतील पाणीसाठा आणि पाणी पातळी वर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे.
रमेश जारकीहोळी हे कर्नाटकाचे जलसंपदा मंत्री आहेत तसेच बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत. बेळगाव जिल्ह्याच्या गोकाक तालुक्यातील असल्याने त्यांना जिल्ह्याचा तर अभ्यास आहेच पण नजीकच्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांशी सुद्धा संपर्क कायम आहे. पूर आला की कोल्हापूर, सांगली आणि बेळगाव जिल्ह्यात काय काय घडते याचा त्यांचा अभ्यास आहे. यापूर्वी हे खाते त्यांच्याकडे नव्हते पण काय केले की पूर टाळता येईल याचाही अभ्यास त्यांनी केलेला आहे. यामुळे समन्वय राखण्याच्या बाबतीत त्यांनी आघाडी घेतली आहे.
महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही या समन्वयात मोठी जबाबदारी उचलली आहे. जयंत पाटील हे देखील सांगली जिल्ह्याच्या इस्लामपूर चे. एक अनुभवी आणि अभ्यासू राजकारणी म्हणून ते ओळखले जातात. राष्ट्रवादी पक्षाच्या पहिल्या फळीतील नेते म्हणून ते परिचित आहेत. त्यांचाही साहजिकच सांगली बरोबरच कोल्हापूर, बेळगाव या जिल्ह्यांशी घरोबा आहे. यातुनच योग्य समन्वय साधला जातोय.
आता पुढील काळात ही याच पद्धतीने अभ्यासू कार्य होण्याची गरज आहे.
ही जुनी बातमी देखील वाचा
कर्नाटक,महाराष्ट्र जलसंपदा मंत्र्यांची पाणी वाटप,पूरस्थिती बाबत चर्चा