दोन दिवसापूर्वी एका महिला सफाई कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर आज मंगळवारी पहाटे महापालिकेच्या एका सफाई ठेकेदाराचा कोरोनामुळे उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागात धास्तीचवातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठेकेदार गेल्या काही दिवसापासून आजारी होता त्यामुळे त्याच्यावर घरामध्येच खाजगी डॉक्टरांकडून उपचार सुरू होते. परंतु तीन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्याला शहरातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याठिकाणी दाखल करून घेण्यास नकार देण्यात आल्यामुळे पॉझिटिव्ह आढळून आलेल्या त्या युवा कंत्राटदाराला बीम्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच दुर्दैवाने आज पहाटे त्याचा मृत्यू झाला. त्याचे वय ४४ असून तो संभाजी नगर वडगाव येथे राहणारा होता.
कोरोना प्रादुर्भाव काळात शहरातील 47 प्रभागांच्या स्वच्छतेचे काम नऊ ठेकेदाराकडे सोपविण्यात आले आहे एखाद्या सफाई कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना दहा ते पंधरा लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी लागते या भीतीने सर्व 9 ठेकेदारांनी शहर स्वच्छतेचे काम बंद करण्याचा निर्णय घेतला होता तथापि मनपा आयुक्त जगदीश यांच्या विनंतीवरून त्यांनी पुन्हा स्वच्छतेचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसापूर्वी एका सफाई महिला कर्मचाऱ्यांचा झालेला मृत्यू आणि आज संबंधित ठेकेदाराचा कोरोनामुळे बळी गेल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागात भितीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, पोलीस, सफाई कर्मचारी यांच्यासारख्या कोरोना वॉरियर्सवर उपचार करण्यास कोणत्याही हॉस्पिटलने नकार दर्शवू नये. तसा आदेश सर्व हॉस्पिटल्सना दिला जावा. तसेच प्रत्येक हॉस्पिटलमध्ये या कोरोना वॉरियर्ससाठी किमान 10 बेड्स आरक्षित ठेवले जावेत. तसेच कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या कोरोना वॉरियर्सच्या कुटुंबीयांना सरकारकडून भरीव नुकसानभरपाई दिली जावी, अशी मागणी केली जात आहे.