कुणाचाही मृत्यू झाला तर त्याच्या मयताला म्हणजेच अंतिम संस्कारांना किती लोक जातात यावरून त्या माणसाने जीवनात कसे वर्तन केले आणि माणसे जोडली की तोडली याचा अंदाज येतो. पण हा भूतकाळ झाला.
आज कोणी वारले तर कोरोनाच्या भीतीने मयताला माणसे येत नाहीत हे वर्तमान आहे. माणूस मिळू नव्हे किंवा कोणी आले नाही तर ती व्यक्ती बाद हे जुने अनुमान तिथे लागू पडत नाही. पण त्याच्या शेवटच्या प्रवासाला साधे वाहन मिळू नये ही शोकांतिका ठरत आहे. माणसाचा मृत्यू स्वस्त झाला आहे त्याला चार खांदे मिळणेही अवघड आहे यातच त्याचा मृतदेह नेण्यासाठीची योग्य व्यवस्था मिळेना हा यंत्रणेचा दोष म्हणावा की यंत्रणा नियोजना अभावी कोलमडली आहे असे म्हणावे हेच कळत नाही.
अथणी येथे एक महिलेचा पती वारला. तिला आपल्या पतीचा मृतदेह नेण्यासाठी गाडी मिळाली नाही. शेवटी हातगाडी बोलावून तिला मृतदेह स्मशानभूमी पर्यंत वाहून न्यावा लागला. एम के हुबळीत मृतदेह सायकल वरून न्यावा लागल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. स्वतः पालकमंत्र्यांनी याबद्दल दुःख व्यक्त केले. यंत्रणा सुधारावी आणि हेळसांड थांबावी ही गरज आहे.
![Athani and mk hubli](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2020/08/IMG-20200817-WA0063.jpg)
आज मरणाचा दर वाढला आहे. सगळेच कोरोना ने मरत नाहीत पण भीती आहे. मानसिक दृष्ट्या खचून, योग्यवेळी उपचार मिळाले नाही म्हणून मरणारे वाढत आहेत. या मृत्यूच्या बातम्यांनी वृत्तपत्रांची पाने आता भरत आहेत. स्वतःला सांभाळणे आणि काळजी घ्या म्हणणे या पलीकडे दुसरा काही मार्ग नाही.
मृत्यू नंतर कुणाचीही परवड होऊ द्यायची नाही हा आता यंत्रणेचा पहिला उद्देश असायला हवा. माणूस किमान शेवटच्या प्रवासात तरी सन्मानाने जावा हीच इच्छा असते. पण आज स्मशानभूमीत परवड सुरू आहे. प्रत्येक गाव, शहरात हेच चित्र आहे.
एवढेच खरे की सध्या मृत्यू पदरात आला तर कोण येणार नाही आणि तुम्हाला स्मशानात कसे नेले जाईल किंवा कसे न्यावे लागेल याचा नेम नाही.