कोल्हापूरसारख्या ठिकाणी उद्योगपती मेनन अँड मेनन कंपनीने जवळपास २१ लाख रुपये किमतीचे, सहजपणे कुठेही घेऊन जाता येणारे असे 3 व्हेन्टिलेटर्स कोल्हापूरच्या जिल्हा रुग्णालयाला मदत म्हणून दिले आहेत. अशी सामाजिक बांधिलकी शक्य असलेल्या प्रत्येकाने जोपासणे गरजेचे बनत आहे.
बेळगावमध्येही रोटरी सारख्या संस्थांनी मदत केली आहे अनेक असे उद्योगपती आहेत केवळ एकाच दुसऱ्या उद्योगपतीने पुढाकार न घेता अनेक जणांनी मिळून अशाप्रकारे सामाजिक बांधिलकी जोपासून समाजासाठी अशी मदत करणे आवश्यक आहे. अनेक गणेशोत्सव मंडळाकडे निधी पडून आहेत. दरवर्षी भक्तिभावाने हजारो रुपयांच्या देणग्या भक्ताकडून सार्वजनिक मंडळांना दिल्या जातात. लिलावाच्या माध्यमातूनही मंडळांकडे मोठ्या प्रमाणात निधी जमा होतो.
यंदाचा गणेशोत्सव कोरोनासाठी सत्कारणी लावण्याची संधी अनेक गणेशोत्सव मंडळांना आहे. भक्तांनी इतकी वर्षे मंडळाच्यावतीने साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवासाठी सढळ हाताने दिलेली देणगी त्याबद्दल आभार मानण्याची हि एक उत्तम संधी आहे. अशा परिस्थितीत जनतेच्या सोयीसाठी गणेशोत्सव मंडळांनी बेड्स, मास्क, सॅनिटायझर, व्हेंटिलेटर सारख्या गोष्टींची व्यवस्था करावी, अनेक गणेशोत्सव मंडळांच्या आसपास मोकळी जागा असेल तर त्याठिकाणी कोरोना आणि इतर आजारांवर उपचार करता येतील का? याची पडताळणी करून व्यवस्था करावी.
सध्या बेळगावमधील परिस्थिती चिंताजनक आहे. कोरोनाव्यतिरिक्त आजारातून अनेकांना उपचाराअभावी हाल सोसावे लागत आहेत. अनेकांना उपचाराअभावी मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. हि परिस्थिती वेळीच रोखणे गरजेचे आहे. सार्वजनिक उत्सवाचा हाच उद्देश असावा आणि अशाच लोकोपयोगी उद्देशाने उत्सव सत्कारणी लागावा.
सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवातच मुळात अशा समाजोपयोगी, लोकोपयोगी उद्देशाने करण्यात आली होती. यंदाच्या गणेशोत्सवात या उत्सवाचे मूर्त आणि मूळ स्वरूप प्राप्त करून देण्याची संधी अनेक गणेशोत्सव मंडळांकडे आहे, आणि हि संधी प्रत्येक गणेशोत्सव मंडळ पार पाडेल, यात शंका नाही.
शहर आणि परिसरात अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत, या सार्वजनिक गणेशोत्सवाचे नेतृत्व करणारी महामंडळे आहेत, या महामंडळाच्या पुढाकारातून आणि सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून उद्भवलेल्या या परिस्थितीवर मात करता येऊ शकेल. अनेक मंगल कार्यालये, इतर हॉल, रिकामी गोडाऊन सारख्या अनेक ठिकाणी आरोग्यसेवेची व्यवस्था करण्यात यावी, आणि या वाढत्या महामारीचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्नशील राहावे. कोलमडलेली आरोग्य सेवा, हतबल झालेली प्रशासन व्यवस्था सुधारण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून गणेशोत्सव सत्कारणी लावावा, हीच इच्छा.