गणेशोत्सव अवघ्या ११ दिवसांवर येऊन ठेपला असून प्रशासनाकडून सार्वजनिक गणेशोत्सवबाबाबत अद्याप कोणतीही नियमावली जाहीर झाली नाही. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांची मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
परंतु उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे तरीही कोणतीच पावले प्रशासनाने उचलली नाहीत. उत्सवाबाबत पोलीस आणि जिल्हा प्रशासन मंगळवारी आपला निर्णय देणार होते. मात्र मंगळवारी कोणताच निर्णय घेतला नाही. त्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
गणेशोत्सव मंडळांनी सर्व तयारी पूर्ण केली आहे. गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. सरकारने कोरोनाबाबत जी नियमावली घातली आहे. त्याचे पालन करत आम्ही गणेशोत्सव साजरा करू, अशी विनंती मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाने केली आहे. मात्र जिल्हा प्रशासन अजूनही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी देण्याबाबत निर्णय घेतला नाही. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांतून नाराजी व्यक्त होत आहे. महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली नियमावली जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांना सादर करण्यात आली आहे. वर्षानुवर्षांचा हा उत्सव खंडित न करता साधेपणाने साजरा करण्यासाठी मंडळे तयार आहेत. श्रीमुर्तीची उंची, भक्तांची गर्दी, वर्गणी, महाप्रसाद आणि इतर विधी या नियमावलीनुसारच पार पाडण्याचीही शाश्वती मंडळांकडून प्रशासनाला देण्यात आली आहे. परंतु याबाबतीत निर्णय घेण्यात प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे.
या उत्सवामुळे अनेक लोकांचे व्यवहार मार्गी लागतात. छोट्या व्यवसायिकांपासून अनेक मोठे व्यावसायिक आणि समाजातील प्रत्येक घटकाला कोणत्या ना कोणत्या मार्गातून पैसा मिळतो. परंतु अजूनही या उत्सवाबाबत ठोस नियमावली जाहीर झाली नसल्यामुळे प्रत्येक जण संभ्रमावस्थेत सापडला आहे. मूर्तिकारांनी श्रीमूर्ती तयार केल्या आहेत. मंटप डेकोरेटरही प्रतीक्षेत आहेत.
विपेत्यांनी मोठय़ा प्रमाणात सजावटीचे साहित्य बाजारपेठेत आणले आहे. परंतु या सर्वांवरच अनिश्चिततेची टांगती तलवार आहे. यामुळे प्रशासनाने वेळेत या उत्सवाबाबत मार्गसूची जाहीर करावी अशी मागणी मध्यवर्ती मंडळासह सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे.