गणेशोत्सव येत्या शनिवार पासून सुरू होतोय. शनिवारी बाप्पांचे आगमन होईल पण यंदा ते वाजत गाजत होणार नाही. वाजत गाजत बाप्पांना आणण्याची सोय उरली नाही. सरकार आणि प्रशासनाने नियम घातलेत म्हणून असा विचार केला तर उत्सवावर विरजण पडले असा अर्थ होतो आणि नकळत उत्साहावर सुद्धा विरजण पडते. यासाठी उत्साह कायम ठेवायला हवा. बाप्पा रोज मना मनात आणि घरा घरात जपला, पुजला आणि भजला जातो. यामुळे कोरोनाच्या संकटात उत्सव मनासारखा करता येत नसेल पण उत्साह ढळू न देता रोग पसरू नये म्हणून काळजी घेत नियम पळत यावर्षी बाप्पाचे स्वागत करावे लागेल.
गणपती ही विद्या, शक्ती, बुद्धी आणि आरोग्याची देवता. या जगात हिंदू धर्म पद्धतीत जन्माला आलेले आणि देव मानणारे जास्तीत जास्त लोक बाप्पाचे भक्त आहेत. लहानपणापासूनच बाप्पाचे आकर्षण असते. यामुळे ज्या घरात गणपती नसतो तेथेही लहान लहान मुले हट्ट धरतात आणि तेथे बाप्पाच्या पूजनाचे सत्र सुरू होते. अर्थात गणपती बसवला जातो.
घरगुती गणपती कुणाचा दीड, पाच, सात तर कुणाचा दहा दिवसांचा. हा काळ मंतरलेला असतो. आधी सजावट, मग रोज पूजन आणि निरोपाचा सोहळा हा काळ प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा.
तरुण वयात तर सामाजिक शिक्षण, नियोजन आणि इतर अनेक गोष्टी या बाप्पाचा सोहळा शिकवतो. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून बाप्पाचे सोहळे रंगवताना युवकातील एक चांगला राजकारणी, लीडर, व्यवस्थापन तज्ञ घडत असतो. हे शहाणपण बाप्पाच्या निमित्ताने येते. याचे श्रेय लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याकडे जाते. फक्त आपल्या घरातील उत्सव असा वैयक्तिक विचार न करता एकत्र या आणि सार्वजनिक स्वरूपात बाप्पाला भजा, पूजा असा संदेश टिळकांनी दिला होता. यामागे लोक संघटित व्हावेत ही इच्छा होती. ब्रिटिश सत्ता उलथवून टाकण्याचा श्रीगणेशा त्यांनी या माध्यमातून केला होता. त्यावेळी विरोध झाला तो परकीयांनी केला होता. यामुळे विरोध झुगारून उत्सव साजरा केला जायचा आणि लोक आपल्या बाप्पाला घेऊन नाचू गावू लागायचे.
आज यावर्षी उत्सवाला विरोध अर्थात नियमांचे कुंपण का? याचा विचार सकारात्मक नजरेतून केला पाहिजे. आजच्या प्रतिकूल परिस्थितीत उत्सवाववर नियंत्रण ही सामाजिक गरज आहे. कोरोनाची लागण संक्रमणातून होते. जास्त लोक एकत्र आले आणि त्यापैकी एकजण बाधित असला तर सगळे रोग ग्रस्त होऊ शकतात. याचा विचार करून सरकारी यंत्रणांनी सगळीकडेच हा नियम लावलाय. उत्सव साधेपणाने करून प्रथा कायम ठेवावी जरूर पण त्यातून रोगाचे संक्रमण जास्तीत जास्त फैलावू नये याची काळजी सुद्धा घ्यावी, यासाठी हा सारा खटाटोप सूरु आहे.
या परिस्थितीने मात्र अनेक गोष्टीवर परिणाम होईल. मूर्तिकार, सजावट साहित्याचे विक्रेते, दिव्याच्या माळा ते फुलांच्या माळाचे विक्रेते, मंडप वाले या आणि इतर अनेक जणांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. बाप्पा दरवर्षी भरभरून देत आला आहे. यंदा थोडा कमी देईल, पण पुढे सर्व काही सुरळीत झाल्यावर सारी भरपाई करेल यावर आम्ही सामान्य माणसांनी विश्वास ठेवला आणि उत्साहावर परिणाम होऊ दिला नाही तरंच बाप्पा चा हा सोहळा अधिक आरोग्यदायी, सामाजिक हित साधणारा आणि रोगावर मात करणारा ठरू शकतो.