झपाट्याने वाढत चाललेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे यंदाच्या गणेशोत्सवाबद्दल संभ्रमावस्था वाढली आहे. बेळगावच्या मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या पुढाकाराने सर्व गणेशोत्सव मंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांना निवेदने दिली आहेत. परंतु गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून अजूनही कोणतीही मार्गसूची सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आली नाही.
याबाबतीत मंगळवारी ठोस निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱयांची बैठक झाली असून या बैठकीत याविषयी चर्चा करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत यासंबंधी एक चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, महानगरपालिका आयुक्त जगदीश के. एच. आदी अधिकाऱयांची बैठक आज पार पडली असून या बैठकीत बेळगाव शहर व जिल्हय़ातील सद्य:स्थितीबद्दल चर्चा करण्यात आली आहे.
कोरोना महामारीच्या वाढत्या संकटामुळे केवळ घरगुती गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. बागलकोट, विजापूरसह अनेक जिल्हय़ांनी सार्वजनिक गणेशोत्सवावर बंदी घातली आहे. मात्र, बेळगावात प्रशासनाने अद्याप भूमिका घेतलेली नाही.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने अद्याप स्पष्ट भूमिका जाहीर केली नाही त्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. गणेशोत्सवाबाबत सोमवारी रात्रीपर्यंत जिल्हा प्रशासन आपली भूमिका स्पष्ट करणार, अशी अपेक्षा होती.
मात्र, राज्य सरकारकडून ठोस नियमावली उपलब्ध न झाल्याने निर्णय मंगळवारपर्यंत लांबला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्हय़ातील परिस्थिती लक्षात घेऊन गणेशोत्सवाबाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱयांना देण्यात आला आहे. नियम व अटी घालून सार्वजनिक गणेशोत्सवाला परवानगी देण्याची शक्यता आहे.