बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. ए. जी. मुळवाडमठ यांच्या निधनामुळे बेळगांवच्या सर्व वकील यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे सध्या कोणीही वकील न्यायालयीन कामकाज करण्याच्या मनस्थितीत नाहीत.
त्यामुळे येत्या 14 ऑगस्टपर्यंत वकील न्यायालयात येऊन कामकाज करू शकणार नाहीत. या दरम्यानच्या काळात न्यायालयाने कोणताही प्रतिकूल किंवा एकतर्फी निकाल देऊ नये, अशी विनंती वकिलांनी केली आहे.
तसेच त्या आशयाचे पत्र बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. गजानन पाटील यांनी मुख्य जिल्हा सत्र न्यायाधीशांना दिले आहे.
दिवंगत ॲड. ए. जी. मुळवाडमठ यांना बार असोसिएशनची श्रद्धांजली
बेळगाव बार असोसिएशनच्यावतीने असोसिएशनचे अध्यक्ष दिवंगत ॲड. ए. जी. मुळवाडमठ यांना आज मंगळवारी श्रद्धांजली वाहण्यात आली.
बेळगाव बार असोसिएशनच्या समुदाय भवनातील ॲड. डी. बी. दीक्षित सभागृहामध्ये र्य श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करण्यात आल्यानंतर असोसिएशनचे अध्यक्ष दिवंगत ॲड. ए. जी. मुळवाडमठ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांची ॲड. मुळवाडमठ यांच्या कार्याचा गौरव करणारी भाषणे झाली. कार्यक्रमास ॲड. गजानन पाटील, ॲड. सी. टी. मजगी, ॲड. आर. सी. पाटील, ॲड. मारुती कामाणाचे आदींसह बार असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.