Wednesday, May 8, 2024

/

“त्या” नियोजित रेल्वेमार्ग सर्वेक्षणाच्या विरोधात शेतकरी होणार आक्रमक?

 belgaum

नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागाकडून नियोजित बेळगांव ते बागलकोट रेल्वेमार्गासाठी नंदिहळळी परिसरातील पिकाऊ जमीन संपादित करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वेक्षण सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच जमीन वाचवण्यासाठी न्यायालयीन लढा देण्याची तयारी शेतकऱ्यांकडून करण्यात येत असून यासाठी लवकरच शेतकऱ्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे समजते.

बेळगाव ते बागलकोट रेल्वेमार्गासाठी नंदिहळळी परिसरातील पिकाऊ जमीन संपादित करण्याऐवजी नजीकची पडीक जमीन संपादित करावी, अशी मागणी केली जात आहे. रेल्वे खात्याकडून मागील वर्षी जमिनीची पाहणी करण्यात आली होती. त्यामुळे त्यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांची भेट घेऊन गार्‍हाणे मांडले होते. तेंव्हा अंगडी यांनी सुपीक जमिनी संपादित करण्यात येणार नसल्याचे आश्वासन दिले होते.

आपली शेती वाचवण्यासाठी नंदिहळ्ळीसह देसुर परिसरातील शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींना अनेकवेळा निवेदने दिली आहेत. मात्र अद्यापपर्यंत त्यांना आश्‍वासनाशिवाय काहीही मिळालेले नाही. आता नंदिहळ्ळी येथील पिकाऊ सुपीक शेत जमिनीमध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू झाले असून त्याठिकाणी खांब उभारण्यात येत असल्याने शेतकरी बिथरले आहेत. या बिथरलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाऊ जमिनी वाचविण्यासाठी न्यायालयीन लढा देण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी लवकरच संबंधित शेतकऱ्यांची बैठक होणार असल्याचे समजते.

 belgaum

बेळगाव ते बागलकोट रेल्वेमार्गासाठी देसुर, नंदिहळ्ळी, राजहंसगड, नागिनहट्टी, अंकलगी, केकेकोप्प, गर्लगुंजी भागातील सुमारे 200 शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. या जमिनीत टोमॅटो, बटाटा, ऊस, मिरची, कोबी, फ्लॉवर, कोथिंबीर, भात यासारखी पिके घेतली जातात. या पिकांवरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अर्थात उपजीविका अवलंबून आहे. यामुळे त्यांच्या जमिनीचे भूसंपादन झाल्यास संबंधित शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर येणार आहेत. यासाठीच या भूसंपादनाच्या विरोधात शेतकरी आक्रमक होण्याची चिन्हे दिसत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.