फक्त कोरोनावर लक्ष केंद्रित न करता सिव्हिल हॉस्पिटलसह शहरातील खाजगी हॉस्पिटल्समध्ये सर्वसामान्य आजार आणि व्याधींवर उपचार केले जावेत या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन मानव अधिकार लोक कल्याण आणि भ्रष्टाचार विरोधी समितीतर्फे आज शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात यावे.
मानव अधिकार लोक कल्याण आणि भ्रष्टाचार विरोधी समितीतर्फे आज शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. कोरोना व्यतिरिक्त अन्य रोग, व्याधी आणि आजारांवरील उपचारासाठी हॉस्पिटल आणि दवाखान्यांमध्ये वेगळी व्यवस्था केली जावी. हॉस्पिटल व दवाखान्यांमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी मास्क परिधान करणे अनिवार्य करावे. गल्लोगल्ली साचणारा कचरा वेळोवेळी स्वच्छ केला जावा किंवा गोळा केला जावा. शहरातील प्रत्येक गल्लीचे रोजच्यारोज निर्जंतुकीकरण केले जावे.
शुद्ध निर्जंतुक पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जावे. कोरोना तपासणी केंद्रातील सोईसुविधा वाढविण्यात याव्यात. जिल्हा रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलसह सर्व खाजगी हॉस्पिटल्समध्ये कमीत कमी खर्चात कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्याचे आदेश दिले जावेत. दिल्ली, मुंबई येथे ज्या पद्धतीने प्लाझ्मा थेरपीद्वारे रुग्णांवर उपचार केले जातात तशा पद्धतीने बेळगावात उपचार केले जावेत. जिल्हा रुग्णालयात जात-पातीवरून भेदभाव आणि भ्रष्टाचार केला जात आहे, त्याची तात्काळ चौकशी करून अशा प्रकारांना आळा घालावा, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
निवेदन सादर करतेवेळी शकील बिडीकर, अब्बू अरब, रहिमा कार्दि, ॲड. आय. एम. कोतवाल नियाज मुल्ला, विजय सांबरेकर, जुबेदाबी के. पठाण, अरुण सालगुडे, ए. बी. किल्लेदार आदी उपस्थित होते.