परराज्यातून तसेच राज्यांतर्गत येणाऱ्या प्रवाशांची इन्स्टिट्यूश्नल काॅरंटाईन प्रक्रिया रद्द करून राज्य शासनाने केवळ होम काॅरंटाईन करण्याचा आदेश दिल्यामुळे या काॅरंटाईन व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी टास्कफोर्स समितीची नियुक्ती केली जाणार आहे. वाॅर्डनिहाय या टास्कफोर्स समितीची नियुक्ती करण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत.
राज्य सरकारच्या आदेशानुसार परराज्यातून येणाऱ्या तसेच राज्यांतर्गत येणाऱ्या व्यक्तींसाठीची इन्स्टिट्यूश्नल काॅरंटाईनची प्रक्रिया रद्द करण्यात आली असून आता केवळ होम काॅरंटाईन करण्यात येत आहे. यामुळे महापालिका व आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांवरील ताण वाढणार आहे. यासाठी होम काॅरंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी स्वयंसहाय्य संघटना, समाजसेवक, सामाजिक संघटना व माजी नगरसेवकांची मदत घेतली जाणार आहे.
या सर्वांच्या मदतीने वॉर्डनिहाय टास्कफोर्स समिती स्थापन करण्याचा आदेश राज्यशासनाने बजावला आहे. त्याचप्रमाणे या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी केली जावी अशी सूचनाही केली आहे. परिणामी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कोरोना नियंत्रणाच्या कामासह आता टास्कफोर्स समिती स्थापन करण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.
टास्कफोर्स समिती स्थापन करण्याची जबाबदारी महापालिकेच्या कौन्सिल विभागाकडे सोपविण्यात आली आहे. या विभागाचे प्रभारी कौन्सिल सेक्रेटरी एफ. बी. पिरजादे यांच्या नेतृत्वाखाली ही जबाबदारी पार पाडली जाणार आहे. त्यामुळे समिती स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिका व्याप्तीतील सर्व 58 वॉर्डांमध्ये टास्कफोर्स समिती स्थापन करण्यासाठी अधिकाऱ्यांची नांवे तसेच सामाजिक संघटना, आरोग्य केंद्राचे नांव आदी सर्व यादी वॉर्डनिहाय तयार करणे गरजेचे आहे.
त्यामुळे संगणकाद्वारे यादी तयार करण्याचे काम गुरूवारपासून कौन्सिल विभागाने सुरू केले आहे. समाज कल्याण खाते तसेच अन्य विभागांकडून स्वसहाय्य संघांची व सामाजिक संघटनांची माहिती घेऊन प्रत्येक वार्डात टास्ककोर्स समिती स्थापन केली जाणार आहे.