कचरावाहू वाहनावरून पडून अपघाती मृत्यू पावलेल्या चालकाच्या कुटुंबीयांना तात्काळ नुकसानभरपाई दिली जावी, या मागणीसाठी मृत चालकाच्या कुटुंबियांसह महापालिका सफाई कर्मचाऱ्यांनी आज सकाळी महापालिकेसमोर धरणे सत्याग्रह केला.
शहरातील फ्रुट मार्केट जवळ रविवारी पहाटे कचरा वाहू वाहनातून पडल्यामुळे जितेंद्र बापू डावाळे (वय 35 रा.ज्योतीनगर गणेशपुर) या चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. जितेंद्र व त्याचे सहकारी केए 37 -5770 क्रमांकाच्या वाहनातून कचरा भरण्यासाठी फ्रुट मार्केट जवळ गेले होते. उताराला वाहन उभे करून कचरा भरण्याचे काम सुरू होते.
दोघेजण कचरा भरून देत होते, तर जितेंद्र त्या वाहनावर उभा राहून कचरा घेत होता. अचानक थांबलेले वाहन पुढे सरकल्याने तो वाहनातून खाली पडला. गंभीर अवस्थेतील जितेंद्रला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले, परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता.
मयत वाहन चालक जितेंद्र डावाळे याची घरची परिस्थिती गरिबीची आहे. घरातील कर्ता पुरुष असणाऱ्या जितेंद्रच्या पगारावर त्याच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालत होता. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन तसेच कर्तव्य बजावत असताना जितेंद्रचा मृत्यू झाला असल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना तात्काळ नुकसानभरपाई दिली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीच्या पूर्ततेसाठी आज मंगळवारी सकाळी डावाळे कुटुंबीयांसह सफाई कर्मचाऱ्यांनी महापालिकेसमोर धरणे सत्याग्रह केला.