राज्यभरासह बेळगाव जिल्ह्यात कोरोना महामारीने आपले तांडव सुरू केल्यामुळे या महामारीला लगाम घालण्यासाठी आज शनिवारी रात्री 8 वाजल्यापासून सोमवार दि. 6 जुलै रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत कडक लॉक डाऊन अंमलात आणला जाणार असून पोलीस खात्याने तशी तयारी केली आहे.
आज शनिवारी रात्री 8 वाजल्यापासून अंमलात आणला जाणारा लॉक डाऊन उद्या रविवारी संपूर्ण दिवस जारी असणार आहे. त्यामुळे या कालावधीत जर कोणी घराबाहेर पडून सार्वजनिक ठिकाणी संचार करताना आढळल्यास त्याला निश्चितपणे पोलिस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
लॉक डाउनच्या काळात दूध, भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने पूर्णतः बंद असतील. ऑटोरिक्षा, सीबीटी बस, टॅक्सी, खाजगी प्रवासी वाहने आदी वाहनांसाठी संचार बंदी असणार आहे. त्याचप्रमाणे दारू दुकानांसह एपीएमसी भाजी मार्केट पूर्णपणे बंद राहील.
लॉक डाऊन यशस्वी करण्यासाठी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त राहणार आहे. लॉक डाऊनच्या कालावधीत विनाकारण गावभर फिरणाऱ्या अतिउत्साही मोटरसायकल चालक आणि कार आदी वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांची विशेष पथके तैनात केली जाणार आहेत. शहरात विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांची वाहने जप्त केली जाणार आहेत. एकंदर बेळगाव शहरासह जिल्ह्यातील लाॅक डाऊन यशस्वी करण्यासाठी पोलीस खात्याने संपूर्ण तयारी केली आहे. त्यामुळे या लाॅक डाऊनच्या काळात नागरिकांनी घरात सुरक्षित राहावे अन्यथा त्यांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागणार हे निश्चित आहे.