शहरातील समर्थनगर वसाहतीमध्ये अलीकडे भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला असून त्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांकडून या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
समर्थनगर येथे अलीकडच्या काळात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. कळपा कळपाने रात्री उशिरापर्यंत समर्थनगर परिसरात मुक्त संचार करणाऱ्या या कुत्र्यांनी अस्वच्छता निर्माण करण्याबरोबरच आपली दहशत देखील निर्माण केली आहे.
यापैकी कांही कुत्री रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या विशेष करून दुचाकी वाहनचालकांच्या अंगावर धावून जात असतात. एकटा-दुकटा माणूस दिसला की अचानक हिंस्त्र बनणाऱ्या या भटक्या कुत्र्यांमुळे या भागात महिन्यातून एक तरी कुत्र्याने चावलेली घटना घडत आहे.
भटक्या कुत्र्यांच्या कळपांमुळे समर्थनगर येथील नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना जीव मुठीत धरावा लागतो. अंगावर धावून जाणाऱ्या कुत्र्यांमुळे येथील लहान मुलांना धोका निर्माण झाला आहे. तेंव्हा महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.