बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अनेक प्राण्यांची बेकायदेशीर रित्या कत्तल केली जाते. १ ऑगस्ट रोजी होत असलेल्या या बकरी ईद दरम्यान होत असलेल्या प्राण्यांच्या चिंताजनक कत्तलींवर बेळगावच्या प्राणी प्रेमींनी आवाज उठविला आहे. यासंदर्भात कर्नाटक राज्य पशुकल्याण मंडळाच्या सदस्या सोनाली सरनोबत यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे.
प्रत्येक वर्षी होणाऱ्या बकरी ईद दरम्यान हजारो प्राण्यांची बाहेरून आयात करून निर्दयीपणे कत्तल केली जाते. कत्तल करून या प्राण्यांचे मांस अस्वच्छ परिस्थितीत टांगण्यात येते.
यामुळे या परिसरातून वर्दळ करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होतो. पर्यायाने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांच्या तब्येतीवरही याचा दुष्परिणाम संभवतो.
या सर्व परिस्थितीचा विचार करून कर्नाटक राज्य पशुकल्याण मंडळाच्यावतीने या पशुहत्या रोखण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कर्नाटक सरकारने याबाबतीत असलेले नियम, अटी आणि कायदे अंमलात आणून वेळीच यावर निर्बंध घालावेत अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी डॉ समीर सरनोबत देखील उपस्थित होते.