Monday, January 27, 2025

/

शहापूर येथील रस्त्यांच्या विकास कामांमुळे नागरिकांची होत आहे कुचंबना

 belgaum

कोरोना प्रादुर्भावाच्या संकटामुळे ठराविक अंतराने लागू करण्यात आलेला लॉक डाऊनमुळे अडथळा निर्माण होऊन स्मार्ट सिटी योजने अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या शहरातील जवळपास सर्व महत्वाच्या रस्त्यांची विकासकामे अत्यंत संथ कासवगतीने सुरू आहे. परिणामी शहापूर येथील जनजीवन असुरक्षित आणि अस्थिर झाल्यामुळे नागरिकांची मोठी कुचंबना होत आहे.

शहापूर भागातील बहुतांश मुख्य रस्त्यांचे काम सध्या सुरू असल्यामुळे या रस्त्यावरून ये जा करणे जोखमीचे ठरत आहे. शहापूरला भेट देणाऱ्या नागरिकांना रस्त्यावरील मातीचे ढिगारे, खड्डे आणि दगडधोंड्यातून वाट काढताना बरीच कसरत करावी लागत आहे. शहराप्रमाणे शहापूर येथील बाजारपेठ देखील मोठी असल्यामुळे सहसा या ठिकाणी खरेदीसाठी बरीच गर्दी होत असते. परिणामी रहदारी देखील मोठ्या प्रमाणात असते. परंतु गेल्या कांही आठवड्यांपासून संथगतीने सुरू असलेली रस्त्यांच्या विकास कामांमुळे सध्या शहापूरची दुरवस्था झाली आहे. परिणामी शहापूर बाजारपेठेत नेहमी गर्दी करणारे अन्य उपनगरातील आणि परगांवातील नागरिक आता क्वचितच शहापूरला जाणे पसंत करताना दिसतात.

वडगांव येथील रहिवासी असलेल्या अश्विनी गायकवाड या गृहिणीने सांगितले की, यापूर्वी जीवनावश्यक साहित्यासह अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी त्या आठवड्यातून बऱ्याचदा शहापूर बाजारपेठेला भेट देत होत्या. परंतु सध्या सुरू असलेल्या विकास कामांमुळे आपल्या स्कूटरवरून शहापूरला जाणे त्यांना जोखमीचे वाटते. “शहापुरात चालत फिरायचे म्हंटल्यास लोकांच्या गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा धोका आहे. त्यामुळे मी माझ्या पतींना आठवड्यातून एकदा मला शॉपिंगला घेऊन जाण्याची विनंती केली आहे”, असे सांगून शहापूर येथील जवळपास सर्व प्रमुख रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे नागरिकांना या भागात फिरणे अवघड जात आहे. यामध्ये कांही ठिकाणी कंटेनमेंट झोनचे बॅरिकेड्स अडथळ्यामध्ये अधिकच भर टाकत असतात, असे अश्विनी गायकवाड यांनी स्पष्ट केले.

 belgaum
Shahapur road
Shahapur road

जुने बेळगाव येथील शेतकरी शेखर सुळगेकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना शहापूर येथील रस्त्यांची विकास कामे हाती घेताना प्रशासनाने नागरिकांसाठी पर्यायी रस्त्याची सोय करणे गरजेचे होते, असे सांगितले. ते पुढे म्हणाले की, येथील रस्त्यांची कामे इतक्या संथगतीने सुरू आहेत की सध्या शहापुरमध्ये एखादे वाहन घेऊन जाणे, विशेषता चारचाकी वाहन घेऊन जाणे अशक्यच आहे. मात्र शहापूर येथील सध्याच्या परिस्थितीची सकारात्मक बाजू अशी की खराब रस्त्यांमुळे बाजारपेठेत होणारी अनावश्यक गर्दी कमी झाली आहे. गरजे शिवाय कोणीही शहापुरात जात नसल्यामुळे सध्याच्या कोरोना संकटकाळात “सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये” या नियमाचे नागरिकांकडून अनाहूतपणे पालन होत असल्याचे सुळगेकर यांनी सांगितले.

दरम्यान, लॉक डाऊनमुळे आधीच बराच कालावधी वाया गेला असून कामगारांचाही तुटवडा आहे. तथापि जनहितार्थ आम्हाला दिलेल्या मुदतीत रस्त्यांची विकास कामे पूर्ण करायची आहेत. तेंव्हा ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी सहनशीलता दाखवून सहकार्य करावे, असे आवाहन स्मार्ट सिटी योजनेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.