प्रशासकीय वैद्यकीय सेवेबाबत दररोज नकारात्मक बातम्या झळकत असून आज पुन्हा एकदा कोरोना संशयितांवर गर्दीत अंत्यसंस्कार केल्याचे प्रकरण पुढे आले आहे.
यामुळे कोरोना संसर्गाचा धोका पुन्हा वाढला आहे. सावगाव आणि कॅम्प येथील कोरोना संशयितांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. आणि या संशयित मृतांवर गर्दीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
गेल्या १५ दिवसात कोरोना बळींची संख्या वाढत चालली असून सर्वसामान्य नागरिक ही परिस्थिती पाहून चिंताग्रस्त बनला आहे. शहरात कुठेही फिरताना खबरदारी घेऊन वावर करणारे नागरिक वैद्यकीय खात्याच्या कारभाराबाबतीत मात्र संशय व्यक्त करीत आहेत. संशयित व्यक्तींचे अहवाल येण्याआधीच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येत आहेत.
आणि या व्यक्तींचे अहवाल नंतर पॉझिटिव्ह येत आहेत. वैद्यकीय सेवेच्या बाबतीत नुकतेच पालकमंत्र्यांनी सूचना आणि आदेश बजावले होते. परंतु वैद्यकीय यंत्रणेत पारदर्शकता येईल कि नाही हे एकंदर परिस्थिती पाहता सांगणे कठीण आहे.
या संशयित रुग्णांवरही सरकारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली असून, उशिरा सुचलेल्या शहाणपणामुळे आणखी कोणाचा नाहक बळी बेजबाबदारपणामुळे यापुढे जाणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक बनले आहे.