केपीसीसी कार्याध्यक्ष असणारे माझे बंधू सतीश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या सर्व मागण्याची पूर्तता सरकारकडून निश्चितपणे केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिली.
शहरात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेतप्रसंगी जिल्हा पालकमंत्री जारकीहोळी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, केपीसीसी कार्याध्यक्ष असणारे माझे बंधू सतीश जारकीहोळी हे माझ्यासाठी मुख्यमंत्र्यांचा सारखे आहेत. त्यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याकडे केलेल्या मागण्या अतिशय रास्त आपल्यामुळे या मागण्या एखाद्या सर्वसामान्य नागरिकांनी केल्या असत्या तरी त्या सरकारने मान्य केल्या असत्या, हेही जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना नुकतेच एक पत्र धाडले आहे. या पत्राद्वारे त्यांनी बेळगाव जिल्ह्यात झपाट्याने वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोरोनाग्रस्त रुग्णांवर चांगले उपचार केले जावेत आणि त्यांना चांगल्या सुविधा पुरविल्या जाव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुप्पा यांच्याकडे केली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांना चांगले उपचार आणि सुविधा देण्याबरोबरच बेळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधील कोव्हीड हॉस्पिटलमध्ये परिवर्तन घडवून सुधारणा केल्या जाव्यात.
आरोग्य खात्यातील रिक्त असलेली पदे तात्काळ भरण्यात यावीत. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना प्रत्येकी दोन अतिरिक्त ॲम्बुलन्स दिल्या द्याव्यात. याप्रमाणे जिल्ह्यात चिकोडी व गोकाक येथे प्रत्येकी एक अशा आणखी दोन कोरोना स्वॅब तपासणी प्रयोगशाळा सुरू कराव्यात, असेही आमदार सतीश जारकीहोळी यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
आमदार सतीश जारकीहोळी यांच्या या सर्व सूचना व मागण्यांची पूर्तता सरकारकडून केली जात असल्याचे आज जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी सांगितले. मागील विधानसभा पोट निवडणुकीप्रसंगी काँग्रेसचे सतीश जारकीहोळी आणि भाजपचे रमेश जारकीहोळी यांच्यात राजकीय संघर्ष झाला होता. त्यानंतर अनेकदा त्यांच्यात शाब्दिक चकमकी उडाल्या होत्या. त्यामुळे राजकारणावरून या दोघा भावांमध्ये वितुष्ट निर्माणची झाल्याची चर्चा होती. तथापि जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचे आपले बंधू सतीश यांच्या बाबतीतील आजचे वक्तव्य पाहता राज्यात सरकार कोणत्याही पक्षाचे असो आणि जारकीहोळी बंधू कोणत्याही वेगवेगळ्या पक्षांचे असोत, परंतु आतून मात्र हे सर्व बंधू एकजूट -एकसंध आहेत हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.