दिवसेंदिवस कोरोनाबाबतीत येत असलेल्या धक्कादायक बातम्यांमधून जनता दिशाहीन झाल्याप्रमाणे वागत आहे. वैद्यकीय यंत्रणेकडून दररोज नवनवे हेवे-दवे समोर येत असून आधीच भयभीत झालेली जनता दिशाहीन होण्याच्या मार्गावर आहे. अशातच राजकारणी मंडळी देखील आपापसातील हेव्यादाव्यांमुळे एकमेकांवर आरोप करीत जनतेला आणखीन भरकटवत आहेत. त्यामुळे कोरोनाशी दोन हात करावे कि घाबरून राहावे अशा संदिग्ध परिस्थितीत जनता अडकली आहे. अशातच आज बेळगाव दौऱ्यावर आलेल्या रमेश जारकीहोळीनि देखील एक नवे विधान पत्रकारांशी बोलताना केले आहे.
बेळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना रुग्णाच्या मृत्यूमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आज पत्रकारांनी जिल्हा पालकमंत्र्यांना प्रश्न विचारले. वाढती रुग्णसंख्या आणि वाढते मृत्यू याबाबत बोलताना रमेश जारकीहोळी म्हणाले कि, कोरोना हा मोठा आजार नाही, यामुळे जनतेने घाबरून न जात आता या रोगाशी लढायचे आहे. मृत्यू आपल्या हातात नसून या रोगाविरुद्ध आपल्याला लढलेच पाहिजे, असे उत्तर त्यांनी पत्रकारांना दिले आहे. यामुळे नवीनच संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
जि. पं. मध्ये सरकारच्या प्रगती आढावा अहवाल प्रकाशन कार्यक्रमासाठी आलेल्या रमेश जारकीहोळीनि आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना कोविड काळात सहकार्य करण्याचे आवाहन केले. आपापल्या कोविड प्रभागात प्रसारमाध्यमांनी लक्ष दिले पाहिजे. यासाठी आपण तयार आहोत का हे आधी प्रसारमाध्यमांनी स्वतः पडताळावे आणि त्यानंतर आम्हाला प्रश्न विचारावे, असे विधान जारकीहोळी यांनी केले आहे.
यावेळी बीम्स वर करण्यात आलेल्या हल्ल्यावर देखील चर्चा करण्यात आली. झालेल्या प्रकारचा निषेध नोंदवून हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून बीम्सच्या व्यवस्थेत सुधारणा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यासंदर्भात चुकीचा संदेश देण्यात येत असून रुग्णांवर उपचार करण्यास नकार देणाऱ्या खाजगी रुग्णालयांवरही कठोर कारवाई करण्याची सूचना संबंधितांना दिली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
मुख्यमंत्री येडियुरप्पा हे उत्तम नेते असून मुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच उद्भवत नाही असे ते म्हणाले. या सर्व अफवा प्रसारमाध्यमांनी पसरविल्या असून मुख्यमंत्री बदलाचा कोणतीही चर्चा होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यंमत्री लक्ष्मण सवदी हे नितीन गडकरींची भेट घेण्यासाठी गेले असून सध्या राज्याच्या विकासावर भर देण्याचे आपले काम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील जनतेच्या आशीर्वादाने संपूर्ण राज्यात विविध विकासकामे करण्यात येत असून जनतेने दिलेल्या सहकार्याचे आपण आभारी आहोत. शिवाय पुढील अडीच वर्षाच्या कालावधीतही अनेक विकासकामे हाती घेण्यात येणार असल्याचेही जारकीहोळीनि सांगितले आहे. २०२३ च्या निवडणुकांसंदर्भात बोलताना ते म्हणाले कि, सत्तेत येण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत, मी एक सामान्य कार्यकर्ता असून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मला कोणतीही कल्पना नसल्याचा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला आहे.