कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात येत्या गुरुवार दि. 30 आणि शुक्रवार दि. 31 जुलै 2020 रोजी कर्नाटक सामान्य प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी परीक्षा होणार आहे. या परीक्षेच्या सुरक्षित आयोजनासाठी कर्नाटक परिक्षा प्राधिकरणाने (केईए) एसओपी जारी केला आहे. त्यानुसार परीक्षेसाठी परराज्यातून येणाऱ्यांना दोन आठवड्याच्या काॅरंटाईनमध्ये सूट देण्यात आली आहे.
केईएच्या मानक कार्यप्रणालीनुसार (एसओपी) काॅरंटाईनसाठी वापरलेल्या कोणत्याही इमारतीची केसीईटी परीक्षा केंद्रासाठी निवड केली जाऊ नये. केसीईटी परीक्षेसाठी येणाऱ्या परराज्यातील परीक्षार्थींना काॅरंटाईनमध्ये सूट देण्यात यावी. या परीक्षार्थीसाठी जिल्ह्याच्या प्रमुखांनी वेगळ्या परीक्षा वर्गाची व्यवस्था करावी. कोरोनाग्रस्त विद्यार्थ्यांनादेखील परीक्षेला बसण्याची संधी मिळेल.
मात्र संबंधित विद्यार्थ्यांनी डॉक्टरांच्या प्रमाणपत्रासह तशी आगाऊ कल्पना अधिकाऱ्यांना दिली पाहिजे. या विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमधून परीक्षा केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली जाईल. कंटेनमेंट झोनमधून आलेले विद्यार्थी परीक्षा केंद्रातील आपल्या वर्गातून बाहेर पडताच अर्ध्या तासात ते वर्ग 1 टक्का सोडियम हायपोक्लोरेटने धुतले जावेत आणि पुन्हा 24 तासानंतर त्या वर्गांचा वापर केला जावा.
परीक्षार्थींनी परीक्षेच्या वेळेच्या दोन तास आधी परीक्षा केंद्रावर हजर राहावयाचे आहे. प्रत्येकाने स्वतःची पिण्याच्या पाण्याची बाटली आणावी. तसेच मास्क परिधान करणे अनिवार्य असेल. परीक्षेला प्रारंभ होण्यापूर्वी तीन दिवस आधी प्रत्येक परीक्षा केंद्रांचे निर्जंतुकीकरण केले जावे. त्याचप्रमाणे प्रत्येक परीक्षेनंतर निर्जंतुकीकरणाची मोहीम राबविली जावी. परीक्षा केंद्रातील स्वच्छतागृहे निर्जंतुक करण्याबरोबरच त्याठिकाणी विद्यार्थ्यांसाठी हँडवॉश व सॅनिटायझर ठेवावेत आदी सूचनांचा कर्नाटक परिक्षा प्राधिकरणाच्या एसओपीमध्ये समावेश आहे.