मरणहोळ (ता. जि.बेळगाव) येथील 900 एकर शेतजमीन सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून हडप करण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या निषेधार्थ आज शुक्रवारी रयत संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडून निवेदन सादर करण्यात आले.
मरणहोळ (ता. जि.बेळगाव) येथील कर्नाटक सीमेवर असलेली 900 एकर शेतजमीन गावातील 160 शेतकरी कुटुंबं कसत आहेत. गेल्या सुमारे शंभर एक वर्षापासून संबंधित शेतकरी कुटुंबं जमिनीत शेती करत आहेत. परंतु अलीकडच्या काळात कांही राजकारणी मंडळी आणि मोठमोठ्या संस्थांचे पदाधिकारी भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही 900 एकर शेतजमीन हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाल्यास मरणहोळ गावातील 160 गरीब शेतकरी कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊन ती रस्त्यावर येणार आहेत. तेंव्हा जिल्हाधिकार्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालून संबंधित जमीन हडपण्याच्या बेकायदेशीर प्रकाराला तात्काळ पायबंद घालावा, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.
कांही राजकारणी मंडळी आणि मोठमोठ्या संस्थांचे पदाधिकारी भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून मरणहोळ येथील 900 एकर शेत जमीन हडप करून गरीब शेतकरी कुटुंबियांना रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तथापि आम्ही हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही असे स्पष्ट करून एका शेतकरी नेत्याने मरणहोळ येथील शेत जमीन हडपण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची बेळगाव लाइव्हला माहिती दिली.
तसेच सध्या कायद्याच्या चौकटीत आम्ही याविरुद्ध लढा देत आहोत. परंतु वेळ आल्यास संबंधित प्रकाराविरुद्ध तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. आज निवेदन सादर करण्यापूर्वी रयत संघटनेतर्फे सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी मरणहोळ येथील शेतकरी कुटुंबांसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
मरणहोळ येथील शेकडो कुटुंबांना वाचवा-शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1167964196894505&id=375504746140458