कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कर्नाटक सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध घातले आहेत. परंतु हिंदू धर्मियांचा हा महत्वाचा उत्सव असून हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
परंपरा खंडित होऊ नये यासाठी नियम आणि अटींसह अत्यंत साधेपणात हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध घालण्यात आल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने नुकतीच एक बैठक घेतली होती.
या बैठकीत निर्बंध झुगारून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले होते. आज मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी निवेदन सादर केले आहे.
बेळगावमधील बहुतांशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साधेपणात गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनासंबंधित सर्व नियम व अटींचे पालन करून परंपरेनुसार हा उत्सव पार पाडण्यात येईल. मुख्यमंत्र्यांनी दिलेला आदेश मागे घ्यावा. सुरक्षेच्या सर्व उपाययोजनांसह, मोजक्या जणांसह आम्ही सार्वजनिक उत्सव साजरा करू असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
हे निवेदन सादर करताना रणजित चव्हाण-पाटील, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे,मदन बामणे , , शिवराज पाटील, रमाकांत कोंडुस्कर आदींसह इतर पदाधिकारी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.