कुडची – बागलकोट दरम्यानच्या नियोजित रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी निवडण्यात आलेल्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया सर्वप्रथम प्राधान्याने हाती घेऊन ती जमीन रेल्वे खात्याच्या ताब्यात दिली जावी, अशी सूचना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी दिली.
बेळगाव जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी आणि रेल्वे खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बेळगाव बागलकोट जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक आज सकाळी शहरात पार पडली. याप्रसंगी बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन रेल्वेमंत्री सुरेश अंगडी बोलत होते. कुडची – बागलकोट रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी तसेच संपूर्ण जमिनीच्या किंमतीपैकी निम्मा म्हणजे 50 टक्के खर्च राज्य शासनाने द्यावयाचा आहे. याची अंमलबजावणी स्थानिक आमदार आणि जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची पूर्तता करता तात्काळ केली जाईल. तथापि शिल्लक 114 एकर जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया त्वरित सुरू झाली पाहिजे असे मंत्री अंगडी यांनी सांगितले.
रेल्वे खात्याचे अधिकारी आणि जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना सदर भूसंपादन प्रक्रिया येत्या 15 दिवसात पूर्ण करण्याची सूचना यावेळी त्यांनी दिली. त्याचप्रमाणे वनखात्याशी संबंधित 41 एकर जमिनीच्या भूसंपादन प्रक्रियेचा वेग वाढविण्याचा सल्ला देखील केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी दिला.
बागलकोट ते कुडची दरम्यानच्या कज्जीडोणी (खाज्जीडोणी) मार्गे नव्याने निर्माण केल्या जाणाऱ्या 142 किलोमीटर अंतराच्या रेल्वेमार्गासाठी 2010 – 11 साली अंदाजे 986.30 कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. रेल्वे खाते आणि राज्य शासन यांच्यात 50:50 टक्के अशा सामायिकरणा आधारे हा खर्च मंजूर झाला असून राज्य शासन आवश्यक जमीन विनाशुल्क देणार आहे.
नियोजित कुडची – बागलकोट रेल्वेमार्गाचा प्रकल्प तीन टप्प्यात पूर्ण केला जाणार आहे. यासाठी एकूण 2487 एकर, 16 गुंठे, 6 एन जमिनीचे भूसंपादन करावे लागणार असून राज्य सरकारने आत्तापर्यंत यापैकी 1301 एकर, 26 गुंठे, 6 एन जमिनीचे भूसंपादन केले आहे. सरकारकडून 1226 एकर, 29 गुंठे, 11 एन जमीन रेल्वे खात्याच्या ताब्यात दिली जाणार आहे. त्यामुळे सरकारकडून अद्याप 1185 एकर, 30 गुंठे जागेचे भूसंपादन होणे बाकी आहे. आज शनिवारी झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी एमजी हिरेमठ यांच्यासह संबंधित विविध प्रशासकीय खात्यांसह रेल्वे खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.