कर्नाटकात कोरोना प्रतिबंधक शुद्ध प्रभावी आयुर्वेदिक औषधाचा शोध लागलेला आहे. मात्र ॲलोपॅथिक माफियांच्या दबावामुळे सरकारने अद्यापपर्यंत त्या औषधी गोळ्या जनतेसाठी बाजारपेठेत उपलब्ध केलेल्या नाहीत, असा स्पष्ट व गंभीर आरोप श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी केला आहे.
शहरात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेतप्रसंगी मुतालिक यांनी उपरोक्त आरोप केला. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, जगात आत्तापर्यंत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झालेली नाही. परंतु अभिमानाची गोष्ट म्हणजे कर्नाटकचे बेंगलोर येथील वैद्य डॉ. गिरीधर कजे यांनी कोरोना प्रतिबंधक शुद्ध आणि प्रभावी आयुर्वेदिक औषध तयार केले आहे. डॉ. कजे हे गेल्या 40 वर्षांपासून रुग्णांवर शुद्ध आयुर्वेदिक उपचार करत आहेत. त्यांनी कोरोनावर औषध शोधून काढले असून सरकारच्या परवानगीने या औषधांद्वारे त्यांनी 10 रुग्णांना पूर्णपणे कोरोना मुक्त केले आहे. कोरोना तपासणीत पॉझिटिव्ह आढळलेले हे रुग्ण डॉ. कजे यांच्या आयुर्वेदिक गोळ्यांमुळे अवघ्या नवव्या दिवशी ठणठणीत बरे झाले. त्यामुळे राज्य सरकारने डॉ. गिरीधर कजे यांच्याकडून संबंधित आयुर्वेदिक औषधाच्या 20 लाख गोळ्या घेतले आहेत. डॉ. कजे यांनीदेखील जनहितार्थ आपल्याकडील संबंधित गोळ्या सरकारला विनाशुल्क दिल्या आहेत. तथापि सरकारने अद्यापपर्यंत त्या गोळ्या जनतेसाठी उपलब्ध केलेल्या नाहीत. याला कारण ॲलोपॅथिक माफिया हे असून त्यांच्यामुळेच ते औषध दडवून ठेवण्यात आले आहे. सरकार आणि संबंधित आयुर्वेदिक औषधांमध्ये हे माफिया उभे असल्यामुळे ते औषध आजपर्यंत जनतेपर्यंत पोहोचलेले नाही, असे प्रमोद मुतालिक यांनी सांगितले.
राज्यात भाजपचे सरकार आहे याचा आम्हाला अभिमान आहे. खरे तर त्यांनी ॲलोपॅथिक माफियांचा अडथळा दूर करून संबंधित औषध जनतेस उपलब्ध करून दिले पाहिजे. परंतु दुर्दैवाने तसे अद्याप पर्यंत झालेले नाही. डॉ. कजे यांनी शोधून काढलेले आयुर्वेदिक औषध अवघे 300 रुपये किंमतीचे आहे. आज कोरोनावरील उपचारासाठी खर्च केले जाणारे हजारो लाखो रुपये लक्षात घेता हे 300 रूपयांचे औषध जनतेसाठी उपयुक्त ठरणार आहे. या औषधामुळे कोरोनाग्रस्त रुग्ण लवकर बरे होतीलच शिवाय गोरगरीब लोकांना ते अल्पदरात उपलब्ध करून देता येऊ शकते असे सांगून ॲलोपॅथिक माफियांच्या दबावाखाली येऊन राज्याचे वैद्यकीय मंत्रीही ही भ्रष्ट झाले असावेत असा संशय मुतालिक यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे संबंधित आयुर्वेदिक औषध राज्यभरात तात्काळ वितरित केले जावे अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणे सत्याग्रह करण्याचा इशाराही प्रमोद मुतालिक यांनी दिला.
पुढे बोलताना आयोध्या येथे येत्या 5 ऑगस्ट रोजी भव्य असे श्री राम मंदिर उभारणीस प्रारंभ होणार आहे. त्या मंदिरासाठी कर्नाटकातील श्री हनुमान जन्मस्थानाच्या ठिकाणची एक शिळा नेण्यात येणार आहे, असे प्रमोद मुतालिक यांनी सांगितले. कर्नाटकातील होस्पेट (जि. बेळ्ळारी) तालुक्यातील हंपी नजीकच्या अंजनाद्री हे श्री हनुमान जन्मस्थान आहे. या ठिकाणची एक शिळा विधीवत पूजा करून रेल्वेमार्गाने अयोध्येला नेण्यात येईल. श्री हनुमान जन्मस्थानची शिळा श्रीराम जन्मस्थानाचा ठिकाणी घेऊन जाण्याची ही घटना देशातील एक ऐतिहासिक घटना ठरणार आहे, असेही श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेस विजय मुरुळ, रवी कोकितकर आदी श्रीराम सेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.