मुख्यमंत्र्यांच्या “कृष्णा” या गृह कार्यालयातील इलेक्ट्रिशियन आणि एका कर्मचाऱ्यांसह एस्कॉर्ट कारचा एक चालक असे तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा हे स्वतः स्वयंस्फूर्तीने होम क्वारंटाईन झाले आहेत.
मुख्यमंत्री सुदैवाने संबंधित तीनही कर्मचाऱ्यांच्या थेट संपर्कात आलेले नाहीत. येडियुरप्पा सध्या आपल्या “कावेरी” या अधिकृत निवासस्थानी वास्तव्यास आहेत. ते येत्या बुधवारपर्यंत सलग 5 दिवस काॅरंटाईन असणार असून या दरम्यान ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपले सहाय्यक आणि अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहतील.
यासंदर्भात मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी ट्विट केले आहे. “कृष्णा” या गृहकार्यालयातील कांही कर्मचारी कोरोनाच्या संसर्गात आले असल्यामुळे मी काही दिवस होम काॅरंटाईन असणार आहे. या काळात मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आवश्यक त्या सूचना आणि सल्ले देईन. मी तंदुरुस्त आहे, काळजी करण्याची गरज नाही. सर्वांनी सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि खबरदारीचा उपाय योजनांचे काटेकोर पालन करावे. सोशल डिस्टंसिंग पाळावे तसेच सक्तीने मास्कचा वापर करावा, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.