भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडच्या (बीबीआयएल) सहकार्याने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) तयार केलेल्या “स्वदेशी कोव्हीड -19 व्हॅक्सिनची” अर्थात कोरोना प्रतिकारक लसीची देशातील निवडक हॉस्पिटल्स आणि प्रयोगशाळांमध्ये जलदगती क्लिनिकल चांचणी घेतली जाणार आहे. बेळगावमध्ये ही चांचणी जीवन रेखा हॉस्पिटलमध्ये घेतली जाणार आहे.
भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडच्या सहकार्याने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने “बीबीव्ही152 कोव्हीड व्हॅक्सिन” ही कोरोना व्हॅक्सिन अर्थात स्वदेशी कोरोना प्रतिकारक लस तयार केली आहे. आयसीएमआरच्या नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ व्हायरोलाॅजी या संशोधन केंद्रात या लसीची निर्मिती करण्यात आली आहे. भारत सरकारच्या उच्चस्तरीय देखरेखीखाली टॉप प्रायोरिटी प्रोजेक्ट अंतर्गत तयार करण्यात आलेली ही भारतातील पहिली स्वदेशी लस आहे. कोरोनाचा झपाट्याने वाढणारा प्रादुर्भाव लक्षात घेऊन येत्या 15 ऑगस्ट 2020 पर्यंत सरकारला ही कोरोना प्रतिकारक लस जनतेच्या आरोग्यासाठी वापरात आणावयाची आहे. मात्र तत्पूर्वी या लसीची अंतिम चाचणी होणे आवश्यक आहे.
गेल्या आठवड्यात ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांनी दोन टप्प्यात या व्हॅक्सिन अर्थात लसीची मानवी चाचणी घेण्यास संमती दिली आहे. यासाठी देशातील निवडक हॉस्पिटल्स आणि प्रयोगशाळांमध्ये जलदगती क्लिनिकल चांचणी घेतली जाणार आहे. या चांचणीला सर्वोच्च प्राधान्य देऊन संबंधित हॉस्पिटल्स व प्रयोग शाळांनी आपला चांचणी अहवाल कोणत्याही परिस्थितीत 7 जुलैपूर्वी सादर करावयाचा आहे. अन्यथा त्याची गंभीर दखल घेतली जाणार आहे.
बेळगाव शहरातील बी. आर. आंबेडकर रोडवर सिव्हिल हॉस्पिटल समोर असणाऱ्या जीवन रेखा हॉस्पिटलमध्ये “बीबीव्ही152 कोव्हीड व्हॅक्सिन” या स्वदेशी कोरोना प्रतिकारक लसीच्या चांचणी घेतली जाणार आहे बेळगावसह देशातील विशाखापट्टणम, रोहटक, नवी दिल्ली, पाटणा, नागपूर, गोरखपुर, कट्टनकुलथुर (तामिळनाडू), हैदराबाद, आर्यानगर, कानपुर (उ. प्र) आणि गोवा येथील हॉस्पिटल्स आणि प्रयोग शाळांची या व्हॅक्सिनच्या चाचणीसाठी निवड करण्यात आली आहे.