आंबेडकर रोड येथील जीवनरेखा रुग्णालयात कोरोनावरील मानवी चाचणीच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ४० जणांना आणि त्यानंतर सुमारे १५० जणांच्या चाचणीचे उद्दिष्ट्य समोर ठेवण्यात आले आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) तर्फे राज्यातील एकमेव रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे. चाचणीच्या पहिल्या टप्प्यात १८ ते ६० वयोगटातील रुग्णांची चाचणी करण्यात येत आहे. या कोव्हॅक्सीनच्या मानवी चाचणीसाठी मागील आठवड्यात स्वयंसेवकांची निवड करण्यात आली होती.
तसेच स्वॅब तपासणीही करण्यात आली होती. याचाचणीत ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला नाही अशांवर याची चाचणी करण्यात येत आहे, अशी माहिती जीवनरेखा रुग्णालयाचे औषध विभागाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमित भाते यांनी दिली आहे.
हि लस हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीकडून तयार करण्यात आली आहे. आयसीएमआरच्या मार्गदर्शनानुसार या लसीची मानवी चाचणी घेतली जात आहे. या लसीचा पहिला डोस दिल्ली येथे २४ जुलै रोजी देण्यात आला होता. बेळगावमद्ये सुरु करण्यात आलेल्या या लसीकरण चाचणीचे पुढील दोन ते तीन महिने निरीक्षण केले जाणार आहे.
या दरम्यान त्यांच्यात रोग प्रतिकारकशक्ती तयार झाली आहे का, याचीही चाचणी केली जाणार आहे. त्याला यश मिळाल्यानंतर तसेच कोरोना संसर्ग होत नसल्याचे निदान झाल्यानंतरच लसीचा विस्तार केला जाऊ शकतो, अशी माहिती डॉ. भाते यांनी दिली.