हलगा सर्व्हिस रोड वर गेले पाच दिवस अन्नपाण्याविना विव्हळत पडलेल्या एका भिक्षुकाला हलगा ग्राम पंचायत सदस्य सुनील कालिंग व फूड फॉर निडीचे सुरेंद्र अनगोळकर यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या निराधार व्यक्तीला खाद्यपदार्थ देऊन तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले.या व्यक्तीच्या अंगावर अनेक जखमा असल्याने ताबडतोब याला रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली.
यावेळी बागेवाडी पोलिस स्थानकाचे एएसआय, गोणी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश लोहार, ऍड. घोरपडे यांचे चिरंजीव सौरभ घोरपडे, महान्तु कमहार, परशु चिक्कपरप्पा, परशुराम बस्तवडकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर या रुग्णाची चौकशी करण्यात आली असून संबंधित व्यक्ती ही उत्तर प्रदेशच्या गोरखपूरचा असल्याचे समजले आहे.
समाजसेवक सुरेंद्र अनगोळकर यांच्याशी “बेळगाव लाईव्ह” ने संपर्क साधला असता त्यांनी याबाबतीत अधिक माहिती दिली. ही संबंधीत व्यक्ती उत्तर प्रदेश येथील गोरखपूर येथिक असून याच्याशी बातचीत केल्यानंतर हा एक कामगार असल्याचे निदर्शनास आले आहे.
![Help for needy](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2020/07/FB_IMG_1596017163421.jpg)
बहुधा लॉकडाऊनच्या काळात आपल्या गावी परतण्यासाठी हा पायी चालत जात असावा. परंतु खाण्यापिण्याच्या गैरसोयींमुळे याची ही अवस्था झाली असावी. या व्यक्तीसोबतच रेल्वेस्थानकाजवळही एक अशीच अनोळखी व्यक्ती आढळली असून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून या जखमेला कीड झाली आहे. या व्यक्तीलाही बीम्स मध्ये दाखल करण्यात आले आहे.
समाजात असे अनेक निराधार लोक आहेत जे कोणत्या ना कोणत्या आजारांनी ग्रस्त झाले आहेत. शिवाय आसरा नसल्यामुळे फुटपाथ किंवा इतर कोणत्याही ठिकाणी आसरा घेत आहेत. अशा लोकांना खाजगी रुग्णालयात उपचार करणे अशक्य आहे. यासाठी जिल्हा रुग्णालयात किंवा प्रशासनाला शक्य असेल त्याठिकाणी अशा लोकांसाठी विनामूल्य व्यवस्था उपलब्ध करावी अशी मागणी सुरेंद्र अनगोळकर यांनी केली आहे.