जि. पं. आरोग्य आणि शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे तब्बल 1 कोटी 45 लाख रुपयांचा निधी पुन्हा सरकार जमा झाल्यासंदर्भात जि. पं. सदस्य आणि आरोग्य व शिक्षण स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांनी आज जिल्हा पंचायत बैठकीत आवाज उठवला. त्याची दखल घेऊन जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याप्रकरणी तात्काळ चौकशी समिती नेमून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.
आगामी 2020 -21 सालासाठी नव्याने मंजूर होणाऱ्या फंड अर्थात निधीच्या विनियोगासंदर्भातील कृती योजना बनविण्यासाठी बेळगाव जिल्हा पंचायतीची बैठक आज सकाळी पंचायत सभागृहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जि. पं. अध्यक्षा आशा एहोळे या होत्या. त्याचप्रमाणे जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी के. व्ही. राजेंद्र हे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना आरोग्य व शिक्षण स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरले यांनी यंदा अधिकाऱ्यांनी ॲक्शन प्लॅन देऊन देखील कामेच केली नसल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसह अन्य विविध विकास कामांसाठी मंजूर झालेला तब्बल 1 कोटी 45 लाख रुपयांचा निधी पुन्हा सरकार जमा झाल्याच्या तक्रारीचा पुनरुच्चार केला.
तसेच जाब विचारल्यास अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचे सांगितले. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र यांनी याप्रकरणी तात्काळ चौकशी समिती नेमून कोणाची चूक आहे हे पाहून कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.
बैठकीत आगामी 2020 -21 सालासाठी नव्याने मंजूर होणाऱ्या फंड अर्थात निधीच्या विनियोगासंदर्भातील कृती योजना तयार करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित सदस्यांनी आपापल्या सूचना मांडल्या. बैठकीस बहुतांश सदस्य आणि विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.