गेल्या चार महिन्यात बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत चौपट वाढ झाली आहे. प्रारंभी गेल्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात 7 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले होते, आता शुक्रवारी या संख्येने 700 चा आकडा पार केला आहे.
जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असले तरी बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यात गेल्या गुरुवारी 92 आणि शुक्रवारी 95 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. केंद्र व राज्य सरकारसह देशातील सर्व यंत्रणा कोरोनासंदर्भात जनजागृती करण्यात व्यस्त आहे. तथापि अद्यापहि लोक विनाकारण घराबाहेर पडून फिरत आहेत. तोंडावर मास्क परिधान न करता सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणारी ही मंडळी विनाकारण स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव तीव्र होऊन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्यास हेच एकमेव कारण असल्याचे सांगण्यात आले आहे.
गेल्या 14 जुलै रोजी एका दिवशी बेळगाव जिल्ह्यात 64 रुग्ण आढळले होते मात्र 16 जुलै गुरुवारी 92 रुग्ण आढळून आल्यामुळे 64 रुग्णांचा उच्चांक मोडीत निघाला त्यानंतर 15 मे रोजी 116 रूग्ण आढळले ही संख्या मी अखेर 161 झाली आणि पुढे जून अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 330 होऊन मृतांचा आकडा 2 झाला होता. त्यानंतर जिल्ह्यातील बाधितांची संख्या झपाट्याने वाढून सध्या जिल्ह्यात एकूण 789 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याप्रमाणे आत्तापर्यंत कोरोनामुळे 21 जणांचा मृत्यू झाला आहे.
रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनाने उपचारासाठी ज्यादा हॉस्पिटल्स उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने बीम्स हॉस्पिटलवरील ताण हलका करण्यासाठी वंटमुरीनजीकच्या हालभावी येथील मोरारजी देसाई निवासी शाळेमध्ये असिम्टोमॅटिक रुग्णांसाठी उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी नुकतीच या 80 बेड्सच्या उपचार केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली आहे.
याठिकाणी डॉक्टर्स आणि शुश्रुषा करणाऱ्यांचे एक स्वतंत्र पथक कार्यरत असणार आहे. या व्यतिरिक्त रुग्णालयामध्ये सध्या 6 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अथणी येथे देखील कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी एक स्वतंत्र हॉस्पिटल कार्यरत करण्याची योजना आहे.