कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनमुळे लोकांवर आर्थिक संकट कोसळले असल्यामुळे बेळगाव महानगरपालिका व्याप्तीतील जनतेकडून यंदाच्या वर्षी कोणताही अतिरिक्त वाढीव कर वसूल न करता तो पुढील वर्षी वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांनी आज दिली.
माजीं नगरसेवक संघटनेने खासदार सुरेश अंगडी पालकमंत्री रमेश जारकीहोळी व आमदार महंतेश कवटगीमठ यांचा त्यांच्या निवासस्थानी तर रमेश जारकीहोळी यांचा शासकीय विश्रामगृहात सत्कार करण्यात आला.यावेळी भाजप नेते किरण जाधव यांच्या सह माजी नगरसेवक संघटना बेळगावचे अध्यक्ष माजी महापौर ॲड. नागेश सातेरी, शिवाजी सुंठकर, सरिता पाटील, शांता बुडवी, रेणू किल्लेकर, दीपक वाघेला, ॲड. धनराज गवळी, संजय प्रभू, नेताजी जाधव आदींसह शहरातील बहुतांश माजी नगरसेवक उपस्थित होते.
शहरातील आपल्या निवासस्थानी माजी नगरसेवक संघटनेशी बोलताना त्यांनी उपरोक्त माहिती दिली. बेळगांव महानगरपालिका व्याप्तीतील अतिरिक्त अन्यायकारक घरपट्टी वाढी संदर्भात काल सोमवारी जिल्हा पालक मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाल्यानंतर शहरातील माजी नगरसेवक संघटनेने आज मंगळवारी सकाळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तसेच कोरोना प्रादुर्भाव व लॉक डाऊनमुळे जनतेची आर्थिक परिस्थिती खूप वाईट असल्यामुळे यंदा महापालिकेचा कर भरणे त्यांना शक्य होणार नाही, हे सरकारच्या निदर्शनास आणून द्यावे, अशी विनंती केली.
यावेळी बोलताना मंत्री सुरेश अंगडी म्हणाले की, कोरोना प्रादुर्भाव व लॉक डाऊन लक्षात घेऊन बेळगावची माजी नगरसेवक संघटना गेल्या दोन महिन्यापासून अन्याय घरपट्टी वाढ रद्द व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे. ही बाब मागील जिल्हा पालकमंत्री जगदीश शेट्टर आणि विद्यमान जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
तेंव्हा आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार एक वर्षभर कोणताही अतिरिक्त कर वसूल केला जाणार नाही. त्याचप्रमाणे नागरिकांनी आपली घरपट्टी वर्षभरात केंव्हाही भरावी, त्यांना दंड आकारला जाणार नाही. तसेच 31 जुलैपर्यंत घरपट्टीमध्ये देण्यात आलेली 5 टक्के सूट त्यानंतरही कायम राहील, असेही अंगडी यांनी स्पष्ट केले.