वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे आज बेळगावच्या साई ग्रुप ऑफ फ्रेंड्सच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनात हलगा येथील सुवर्ण सौधमध्ये कोविड केअर सेंटर उभे करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस सर्वत्र पसरत आहे. प्रशासन, नागरिक यावरील उपचार करून हतबल झाले आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांवर उपचार करणेदेखील कठीण झाले आहे. या सर्व रुग्णांची व्यवस्था प्रशासनाने बीम्स रुग्णालयात केली आहे. परंतु वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येमुळे येथील जागा आणि बेड अपुरे पडत आहेत.
याविषयी सरकारने पर्यायी व्यवस्था म्हणून खाजगी रुग्णालयामध्ये कोविड रुग्णांवर उपचार करण्याचे आदेश दिले. परंतु खाजगी रुग्णालयातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. शिवाय खाजगी रुग्णालयाचे दर हे सर्वसामान्य जनतेला परवडणारे नाहीत. यामुळे आधीच घाबरलेल्या जनतेने पुढील काळात कोणाच्या भरवशावर राहावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून प्रशासनाने हलगा येथील मिनी विधानसौध येथे कोविड केअर सेंटरची उभारणी करावी, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या संकटाची बेळगाव जिल्हा सज्ज राहील, आणि रुग्णांचे हाल होणार नाहीत. यामुळे सरकारने याचा विचार करावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रसंगी प्रवीण पाटील, कादरभाई, संतोष जन्तीकट्टी, सादिक इनामदार, यल्लाप्पा अनंतपूरे, किल्लेकर, गजानन क्षीरसागर, गजानन पाटील, विक्रम आपटेकर, राजू शहापूरकर, प्रमोद आपटेकर, ओमकार अनगोळकर आदी उपस्थित होते.